Israel-Hamas War : हमासच्या १५० तळांवर स्पंज बॉम्बद्वारे हल्ले | पुढारी

Israel-Hamas War : हमासच्या १५० तळांवर स्पंज बॉम्बद्वारे हल्ले

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीत घुसून हमासच्या 150 अधिक तळांवर जोरदार हल्ला केला आहे. हमासचे भुयारी तळ आणि बंकर्स नेस्तनाबूत करण्यात आले आहेत. गाझा पट्टीत घुसून रणगाड्यातून हल्ले करतानाचा व्हिडीओ इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रथमच जारी केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांविरोधात युद्ध अखेरच्या टप्प्यात आल्याचा दावा इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) केला आहे. (Israel-Hamas War)

इस्रायलच्या फौजांनी शुक्रवारी रात्री गाझा पट्टीतील उत्तरेकडील भागात घुसून जमिनीवरील कारवाईसह हवाई हल्ल्यातून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. गाझामध्ये थेट रणगाडे घुसवून तोफगोळ्यांचा हल्ला केला. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला. यामध्ये सुमारे 1400 जणांचा मृत्यू झाला असून हमासने 220 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले आहे. गाझा पट्टीतील उत्तरेकडील भागात हमासचे मोठ्या प्रमाणात तळ असल्याचे लक्षात येताच इस्रायलने आक्रमकपणे समुद्र आणि जमिनीवरून हल्ले सुरू केले आहेत. गाझातील उत्तर भागातील नागरिकांना दक्षिणेकडे स्थलांतर करण्याचे आवाहन करून इस्रायल सैनिक हमासचे तळ उद्ध्वस्त करीत आहेत. हमासच्या भुयारातील 150 तळावर हल्ले करून नेस्तनाबूत करण्यात आले आहेत. इस्रायल सैनिकांनी हमासच्या हवाई दल विभागाचा कमांडर इस्साम अबू रुकबेह याचा खात्मा केला आहे.

इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यामुळे विस्थापित झालेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा करण्यातही अडचणी येत आहेत. बॉम्बहल्ल्यामुळे मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

Back to top button