Latest

डोंबिवली  : ४० लाखांसाठी मुलाचे अपहरण; टाेळी जेरबंद

निलेश पोतदार

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : खंडणीसाठी अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्या दाम्पत्याच्या (९ वर्षीय) मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या चौघा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला यश आले आहे. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका करणाऱ्या क्राईम ब्रँचच्या पथकाचे जिल्हा पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी कौतुक केले आहे. मुलाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे.

प्रभातकुमार अमर सिंह (वय ३०), अमजद मन्सूर खान (२३), योगेंद्र जवाहरलाल सिंग (२०) आणि सुनील सीताराम लाड (५७) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आराेपींची नावे आहेत. न्‍यायालयाने  चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, अंबरनाथ पूर्वेकडे राहणाऱ्या सोनूकुमार बारेलाल सविता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण

सोनूकुमार यांच्या कृष्णा नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. कृष्णा चौथ्या इयत्तेत न्यू डेक्कन इंग्लिश स्कूल या अंबरनाथ पश्चिमेकडील शाळेत शिक्षण घेतो. सध्‍या शाळा बंद असल्यामुळे कृष्णा घरीच असतो; परंतु जवळच असलेल्या ट्युशनसाठी तो जात हाेता.

बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातनंतर परशुराम रेसिडेन्सी येथून कृष्‍णा याचे अपहरण करण्‍यात आले हाेते.

आई-वडिलांना कृष्णा सुखरूप परत हवा असेल तर चाळीस लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी इंटरनेट कॉल वापरून अपहरणकर्त्याने दिली.

मोबाईलवर खेळतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे

संशयित आराेपी घटनेपूर्वी तीन ते चार दिवस याच परिसरात वावरत होता. त्या ठिकाणी मोबाईलवर खेळताना आणि वावरत असताना त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी तपासाच्या सूचना दिल्या.

यानंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली. अपहृत बालकाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणण्यासाठी क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तळ ठोकला होता.

त्यासाठी क्राईम ब्रँचने घटना घडलेल्या परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात केली.

त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून संशयित इसमाचे फोटोग्राफ्स तयार करण्यात आले.

संशयिताच्या वर्णनाप्रमाणे कुणी व्यक्ती या परिसरात आली आहे का, याचा शाेध स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचने सुरु केला.

क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला धागा सापडला

संगणक तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व प्रत्यक्ष फिल्डवरील माहितीचे साह्य घेऊन कृष्णाचे अपहरण करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी तपास चक्रांना वेग दिला.

मात्र क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला धागा सापडला.

या युनिटचे विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार व पोलिस निरीक्षक विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर यांच्यासह पथकाने कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशन परिसरात सापळा रचला.

अपहृत कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. त्याचबरोबर खंडणीसाठी कृष्णाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या चारही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले.

अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट

अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून कृष्णाशी ओळख वाढवली.

त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे, गप्पा मारण्याच्या माध्यमातून त्यातील एकाने कृष्णाशी मैत्री केली.

मात्र स्वतःचे नाव कृष्णाला कळू दिले नाही.

सावज जाळ्यात आल्याची खात्री पटताच अपहरणकर्त्यांनी कृष्णाचे अपहरण केले.

कृष्णाला काहीही कळू न देता त्याच्या आई-वडिलांकडे चाळीस लाखांची मागणी केली.

४० लाखांची मागणी करत मुलाला ठार मारण्‍याची धमकी 

४० लाख रुपये दिले नाही तर  तुमच्या मुलाला ठार मारण्यात येईल, अशीही अपहरणकर्त्यांनी धमकी दिली होती.

मात्र अपहरणकर्त्या चौघांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका करण्यात क्राईम ब्रँचला यश आले.

त्यासाठी अहोरात्र आणि अथक परिश्रम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आयुक्त जयजित सिंग यांनी अभिनंदन केले.

तर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या कृष्णाचेही त्याच्या धाडसाबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT