न्यूयॉर्क : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने नुकताच मंगळभूमीवरील खडकाचा नमुना यशस्वीरीत्या मिळवला आहे. आता 'नासा'ने म्हटले आहे की या नमुन्यावरून असे संकेत मिळतात की मंगळावर जेझेरो क्रेटर या विवराच्या ठिकाणी एकेकाळी जीवसृष्टीला अनुकूल स्थिती होती.
ज्या खडकाचा नमुना रोव्हरने घेतला आहे तो खडक बॅसॉल्टचा असून ज्वालामुखीच्या लाव्हापासून बनलेला आहे. अशा खडकांमध्ये सिलिका कमी आणि लोह व मॅग्नेशियम अधिक असते.
या शोधावरून हे जाणून घेण्यास मदत मिळेल की तेथील प्राचीन सरोवर कधी बनले व ते कधी नष्ट झाले. 'जेझेरो' असे नाव दिलेल्या या मोठ्या विवराच्या किंवा सखल भागाच्या ठिकाणी एकेकाळी पाणी होते असे संशोधनातून दिसून आले होते. त्यामुळे 'नासा'ने पर्सिव्हरन्स रोव्हरला याच ठिकाणी उतरवले.
मंगळाच्या या भागात एकेकाळी पाणी असल्याने तिथे कदाचित त्यावेळी जीवसृष्टीही असण्याची शक्यता आहे. क्रेटरच्या सेडिमेंटस्मध्ये या प्राचीन जीवसृष्टीचे संकेत मिळतात का हे पाहिले जात आहे. तसेच भविष्यकाळात तिथे जीवसृष्टी शक्य होऊ शकते का याचीही चाचपणी केली जात आहे. मंगळावर रोव्हरने यापूर्वी एका खडकाचा नमुना घेण्याचा प्रयत्न केला होता; पण तो अयशस्वी ठरला.
दुसर्या प्रयत्नात मात्र रोव्हरला यश आले. या दोन्ही खडकांवरून असे दिसते की या भागात भूमिगत पाणी बराच काळ होते. 'नासा'च्या मुख्यालयातील या प्रोजेक्टचे संशोधक मिच शूल्ट यांनी सांगितले की हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आल्यावर त्यांचे प्रयोगशाळेत अधिक विश्लेषण करण्यात येईल.