Latest

Chandrakant Patil : सुप्रिया सुळेंबाबतच्या वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केली दिलगिरी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करुन पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली होती. अखेर पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून दिलगिरी व्‍यक्‍त केली आहे.

(Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात  स्वयंसिद्धा, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रदिवस काम केले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी. ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. सुप्रियाताईबद्दल, महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दुःख नाही.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनीना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार आहात ना, समजत नसेल, तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतर पाटील यांच्याविरोधात राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलन करत त्यांनी माफी मागण्याची मागणी लावून धरली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT