Latest

Cervical Cancer : गर्भाशय मुखाचा कॅन्सर कसा टाळावा? जाणून घ्या लक्षणे

अनुराधा कोरवी

गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही)चे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ( Cervical Cancer )

संबंधित बातम्या 

पण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही)चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होतो, असे नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनाच त्रास होण्याची शक्यता असते. नियमित तपासणी आणि पॅप स्मिअर चाचणी केल्याने वेळीच प्रतिबंध करता येऊ शकते.

कारणीभूत घटक

  • असुरक्षित लैंगिक संभोग हे यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांपैकी एक आहे. एकापेक्षा जास्त लैंगिक भागीदार असणे किंवा अकाली लैंगिकद़ृष्ट्या सक्रिय होणे गर्भाशयाच्या मुख्याच्या कर्करोगास कारणीभूत ठरते.
  • अनेक तरुण स्त्रियांचे एचपीव्हीसाठी नियमित तपासणी किंवा लसीकरण नसते. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
  • धूम्रपान आणि चुकीची आहारपद्धती.

लक्षणे

  • कर्करोग हा सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाही. मासिक पाळीदरम्यान, रजोनिवृत्तीनंतर किंवा लैंगिक संभोगानंतर होणारा रक्तस्राव याकडे अनेक स्त्रिया किरकोळ शारीरीक समस्या म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचेहे प्रारंभिक लक्षण असू शकते.
  • इतर लक्षणांमध्ये ओटीपोटात होणार्‍या वेदना किंवा संभोगादरम्यान होणार्‍या वेदना यांचा समावेश होतो.

कर्करोग कसा टाळावा?

  • एचपीव्ही लसीकरण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित तपासणी, वेळीच निदान आणि उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
  • धूम्रपान न करणे आणि सुरक्षित लैंगिक संभोग यासह निरोगी जीवनशैली राखणे, हे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका टाळते. तरुणींनी त्यांच्या लैंगिक आरोग्याबाबत जागरूक असणे आणि त्यांच्या शरीरात काही असामान्य लक्षणे किंवा बदल दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. ( Cervical Cancer )
SCROLL FOR NEXT