Pancreatic Cancer : पॅन्क्रिअ‍ॅॅटिक कॅन्सरच्या अंतरंगात…

Pancreatic Cancer : पॅन्क्रिअ‍ॅॅटिक कॅन्सरच्या अंतरंगात…

स्वादुपिंडाचा कर्करोग (पॅन्क्रिअ‍ॅॅटिक कॅन्सर) हा एक जटिल आजार आहे आणि हा आजार झाल्यानंतर व्यक्तीचा बचाव होण्याचा दर सर्वांत कमी आहे. त्याचे स्क्रीनिंग आणि निदान या गोष्टीही जटिल आहेत. कर्करोगाच्या इतर प्रकारांप्रमाणे हा सामान्य आजार नाही, तर दुर्मिळ आहे; परंतु पूर्वेतिहास पाहता तो घातक आहे हे नक्की. (Pancreatic Cancer)

अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन या संस्थेच्या मते, स्वादुपिंडाचा कर्करोग लोकांना होण्याचे प्रमाण खूप कमी आहे; परंतु तो जडल्यानंतर त्यातून सहीसलामत वाचण्याचा दरही कर्करोगाच्या प्रकारांत सर्वात कमी आहे. पोटाच्या मागील बाजूस पाठीच्या कण्याच्या समोर स्वादुपिंड असते. स्वादुपिंडाचा कर्करोग सामान्यतः एक्झोक्राईन पेशीपासून सुरू होतो. यामुळे कोणत्याही स्रावाची निर्मिती होत नाही आणि इतरही कोणते लक्षण दिसून येत नाही. (Pancreatic Cancer)

स्वादुपिंडाचा कर्करोग खूपच दुर्मीळ आहे, पण हा कर्करोग जीवघेणा असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याची प्रारंभिक लक्षणे दिसत नाहीत. आजाराने मोठ्या प्रमाणावर पेशींना प्रभावित केल्यानंतर आणि या पेशी स्वादुपिंडाच्या बाहेर पसरू लागल्यानंतरच लक्षणे दिसू लागतात. प्राथमिक टप्प्यात उपचार सुरूच होऊ शकत नाहीत आणि पुढील टप्प्यात उपचार झालेच तरी फारसा फायदा होत नाही. स्वादुपिंडातील पेशींमध्ये अचानक वाढ होते, तेव्हा या कर्करोगाची सुरुवात होते. अनियंत्रित पेशींमुळे घातक ट्यूमर तयार होतो आणि रक्तप्रवाहाबरोबर शरीराच्या अन्य भागांवरही या पेशी हल्ला करतात. त्यामुळे एकेक अवयव निकामी होत जाऊन अखेर रुग्णाचा मृत्यू होतो.

स्वादुपिंडातील ग्रंथी शरीरासाठी पॅन्क्रिअ‍ॅटिक ज्यूस, हार्मोन्स आणि इन्सुलिन तयार करतात. स्वादुपिंडातील एक्सोक्राईन आणि एंडोक्राईन या भागात कर्करोगाची वाढ होते. एक्सोक्राईन कर्करोग स्वादुपिंडातील ग्रंथीच्या आत असतो तर एंडोक्राईन कर्करोग शरीरासाठी हार्मोन्स तयार करणार्‍या भागात वाढतो. या दोन्ही प्रकारांत रुग्णाची प्रकृती खालावण्यापूर्वी कोणतेही लक्षण दिसत नाही. जी काही लक्षणे दिसून येतात, ती इतर काही आजारांच्या लक्षणांशी मिळतीजुळती असल्यामुळे रुग्ण त्यावर उपचार घेत राहतो. या काळात कर्करोगाची स्वादुपिंडात वाढ होत राहते. काही लक्षणे अशी आहेत, जी शरीरात अचानक दिसू लागली आणि प्रदीर्घ काळ टिकून राहिली, तर एकदा स्वादुपिंडाची तपासणी करून घेणे आवश्यक असते. या लक्षणांमध्ये पोट आणि पाठीत दुखणे, अचानक वजन कमी होणे, पचनासंबंधीच्या तक्रारी, सतत ताप येणे, भूक मंदावणे, त्वचेचा कोरडेपणा वाढणे, बेचैनी आणि उलटी होणे, कावीळ, शौचाला करड्या रंगाचे होणे, उच्च रक्तदाब अशा लक्षणांचा समावेश आहे. (Pancreatic Cancer)

स्वादुपिंडाचा कर्करोग महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात होतो. सामान्यतः पुरुषांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा आजार पुरुषांना जडण्याची शक्यता अधिक असते. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत धूम्रपान करणार्‍या व्यक्तीच्या बाबतीत स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्यता दोन ते तीन पट अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, रेड मीट किंवा चरबीयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात करणार्‍या व्यक्तींनाही हा आजार जडू शकतो. फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. वैद्यकशास्त्रात या कर्करोगाला 'मूक कर्करोग' असेही म्हटले जाते. कारण, या आजाराची लक्षणे शरीरात निर्माण झाली, तरी ती लवकर दिसून येत नाहीत. या आजाराचे ट्यूमर सुरुवातीच्या काळात डॉक्टरांनाही सहजपणे दिसून येत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news