दिल्लीसह देशाच्या विविध भागात डेंग्यूचा प्रकोप (dengue )वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 9 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपली आरोग्य पथके पाठविली आहेत. यामध्ये हरियाणा, केरळ, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी अलिकडेच या मुद्यावर वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये वर्ष 2018 नंतर पहिल्यांदाच यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर नोंदविली गेली आहे. राजधानीतील रुग्णसंख्या हजारावर गेली आहे. दुसरीकडे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांतही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. वरील 9 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत गतवर्षीपेक्षा रुग्णांची संख्या जास्त नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण डेंग्यू रुग्णांपैकी 86 टक्के रुग्ण 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत आहेत. संपूर्ण देशाचा विचार केला तर 31 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख 16 हजार 991 रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूवर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आरोग्यविषयक पथके पाठविली असून ही पथके राज्यातील आरोग्य यंत्रणांना आवश्यक ते मार्गदर्शन करतील, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. डेंग्यूचे लवकरात लवकर निदान करणे, मेडिकल किट्स उपलब्ध करणे, डासांचा नायनाट करणार्या किटकनाशकांचा पुरवठा, रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा आदी कामांची जबाबदारी केंद्रीय पथकांकडे देण्यात आली आहे.