Latest

वाई : कृष्णामाईचा दागिना आज होणार लुप्त

Shambhuraj Pachindre

वाई शहराच्या मध्यातून पश्चिम महाराष्ट्राची भाग्यरेषा असणारी कृष्णा नदी वाहत जातेे. या कृष्णा नदीवर सात घाट आणि शेकडो पौराणिक मंदिरे असल्यामुळे वाई शहरास दक्षिण काशी संबोधले जाते. वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पूल म्हणून ज्याची ओळख आहे असा ब्रिटीश कालीन कृष्णा पूल म्हणजे कृष्णामाईच्या गळ्यातील अमूल्य दागिनाच. हाच दागिना आज लुप्त होणार असून काळाच्या उदरात तो गायब होणार आहे. या पुलाला 135 वर्षे पूर्ण झाली असून शुक्रवारी तो पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाईकरांमधून हळहळही व्यक्त होत आहे.

पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीशांचे पत्र ; 15 कोटींचा होणार नवा पूल

हा पूल 1884 साली ब्रिटीशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला 135 वर्षे पुर्ण झाली. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1984 साली ब्रिटीश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठवले होते. या पुलावर मोठया प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पूल उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी दिली. नवीन तंत्रज्ञानाने युक्त पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला. नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद असला तरी गेली अनेक वर्षे ज्यांनी वाईकरांना खंबीर साथ दिली त्या पुलाविषयी वाईकरांच्या भावना अतिशय हळव्या आहेत.

पुलाच्या आठवणी हृदयाच्या कप्प्यात

शेवटची आठवण म्हणून अनेक जण पुलावर उभे राहून फोटो काढत आहेत. काही जण सेल्फी विथ पूल करत आहेत तर काही जण शेवटचं पुलावरून पायी चालत जातं आहेत. सोशल मीडियावरही अनेक भावुक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरीही शुक्रवारी हा पूल इतिहास जमा होणार आहे.

स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी अन् हिंदी, मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा साक्षीदार

वाईतील कृष्णा पुलाने अनेक महाप्रचंड पूर झेलत वाईकरांची सेवा केली. स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी, अनेक हिंदी, मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा साक्षीदार ठरला. अनेक संकटातही न डगमगता वाईच्या दोन्ही भागाचा दुवा बनला. खंबीरपणे कृष्णा नदीत आपले मजबूत पाय रोवून उभा राहिला व आपल्या कणखर पाठीवर आनंदाने ओझं वाहत राहिला. कृष्णामाईच्या गळ्यातील अमूल्य दागिनाच ठरला आहे.

वाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असून प्रसिध्द पर्यटनस्थळ असल्याने या ब्रिटीशकालिन पुलावर रहदारी मोठया प्रमाणावर असते. महागणपती मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाची उंची कमी असल्याने पूरस्थितीत या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. महापुराचा धोका व भविष्यातील गरज लक्षात घेऊन ब्रिटीशकालिन पुलाच्या जागी एक नवीन कृष्णा पुलाचीच उभारणी होणार असून तो वाईच्या वैभवात भरच घालेल.
– अनिल सावंत, नगराध्यक्ष, वाई नगरपालिका

सांस्कृतिक, ऐतिहासिक वाई शहराच्या वैभवात भर टाकणारा व शेकडो घटनांचा साक्षीदार शतकवीर पूल सेवानिवृत्ती घेतोय, ही घटना सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. भविष्याची गरज पाहता व शहराच्या विकासाच्या दृष्ठीने नवीन पुलाची उभारणी हे एक महत्वाचे पाऊल आहे. या पुलाच्या घडीव दगडींचा पुन्हा वापर व्हावा, अशी वाईकर नागरिकांची मनापासूनची इच्छा आहे.
– भारत खामकर, नगरसेवक वाई नगरपालिका

पाहा व्हिडिओ : सांगलीतील आयर्विन पूल झाला ९२ वर्षाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT