Latest

Boxing Day Test : इंग्लंडची ऑस्ट्रेलियासमोर शरणागती!, पहिला डाव १८५ धावांत संपुष्टात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Aus vs ENG) यांच्यातील अॅशेस कसोटी सामना आजपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरू झाला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा इंग्लंडची कामगिरी अत्यंत खराब झाली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १ गडी गमावून ६१ धावा केल्या. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा मार्कस हॅरिस २० आणि नाईटवॉचमन नॅथन लियॉन खाते न उघडता क्रीजवर आहेत. (Boxing Day Test)

बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यात, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे योग्य ठरला. पुनरागमन करणारा कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी मिळून इंग्लंडच्या डावाला वेसन घातली.

पॅट कमिन्सने इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले…

आपले खातेही उघडू न शकलेल्या हसीब हमीदला पॅट कमिन्सने प्रथम बाद केले. यानंतर त्याने जॅक क्रॉलीलाही १३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जो रुट यांनी थोडा वेळ डाव सांभाळला आणि तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. मालनला पॅट कमिन्सने वॉर्नरच्या हाती झेलबाद केले. तो केवळ १४ धावा करू शकला. या दरम्यान पॅट कमिन्सने मायदेशातील मैदानांवरील १०० कसोटी बळीही पूर्ण केले. (Boxing Day Test)

इंग्लंडला कर्णधार जो रूटकडून खूप आशा होत्या पण तोही अर्धशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने सर्वाधिक ५० धावांची खेळी खेळली. बेन स्टोक्सने २५ आणि जॉनी बेअरस्टोने ३५ धावा केल्या. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे, इंग्लंडचा संघ उभारी घेऊ शकला नाही आणि त्यांनी यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. अखेर त्यांचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टार आला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने प्रत्येकी ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारू संघाला डेव्हिड वॉर्नरने धमाकेदार सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाने अवघ्या १४ षटकांत ५७ धावा केल्या. वॉर्नर ४२ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३८ धावा करून बाद झाला. त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. ऑस्ट्रेलिया आता इंग्लंडपेक्षा फक्त १२४ धावांनी पिछाडीवर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT