पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचे माजी कर्णधार रे इलिंगवर्थ (ray illingworth) यांचे निधन झाले आहे. शनिवारी (दि. २५) वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यॉर्कशायर काउंटी संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रे इलिंगवर्थ यांच्या निधनाची माहिती दिली. अष्टपैलू इलिंगवर्थ यांनी १९५१ मध्ये प्रथम श्रेणी कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९८३ मध्ये वयाच्या ५१ व्या वर्षी निवृत्ती घेतली.
इलिंगवर्थ (ray illingworth) यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, त्यांनी ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ७८७ प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ने २४ हजारांहून अधिक धावा आणि २००० हून अधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. ते जगातील ९ खेळाडूंपैकी एक आहेत ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० विकेट्स घेण्याव्यतिरिक्त २० हजार हून अधिक धावा केल्या आहेत. इलिंगवर्थ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४१३४ धावा केल्या आणि २०७२ बळी घेतले. ज्यामध्ये त्यांनी एका मोसमात ६ वेळा १००० धावा केल्या आणि १०० बळी घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली यॉर्कशायरच्या संघाने काउंटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद तीन वेळा जिंकले.
इलिंगवर्थ (ray illingworth) यांनी १९५८ ते १९७३ दरम्यान इंग्लंडसाठी ६१ कसोटी सामने खेळले आणि १८३६ धावा केल्या. तसेच १२२ बळीही घेतले. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०-७१ मध्ये ॲशेस मालिकेत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यांनी ३१ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यात त्यांनी १२ कसोटी जिंकल्या.
निवृत्तीनंतर, ते समालोचक, प्रशिक्षक या भूमिकेतून क्रिकेटशी जोडले गेले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी उघड केले होते की, त्यांच्याचर अन्ननलिका कर्करोगावर उपचार सुरू आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.