Latest

बेळगाव : श्री क्षेत्र आप्पाचीवाडीत हालसिद्धनाथांची भाकणूक : समान नागरी कायदा अस्‍तित्‍वात येईल

निलेश पोतदार

निपाणी; मधुकर पाटील श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी (ता.निपाणी) येथे महाराष्ट्र-कर्नाटकसह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज (मंगळवार) पहाटे श्री हालसिद्धनाथांची मुख्य भाकणूक झाली. वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली. यंदा ही भाकणुक यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून; भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मंगळवार या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतला. उद्या बुधवार (दि.1) रोजी उत्सवस्थळी बसलेली पालखी सायंकाळी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.

नाथांच्या भाकणुकीतून यंदा नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ महाराज म्हणाले, येत्या काळात शेतकऱ्याला सुगीचे दिवस येणार असून, तूर, मुग, सोयाबीन यासह कडधान्य चांगले पिकणार आहेत. जातीपातीतील भांडणे कमी होण्यासाठी समान नागरी कायदा अस्तित्वात येणार आहे. नाथांच्या मंदिर बांधकामाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे खडकाचा राजदरबार बघावयास जगभरातून लोक येतील. धावण्याला धावीन, नवसाला आणि पावत राहील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल. डाळींचे भाव तेजीत राहतील. शेतकऱ्यांना आपल्या कष्टाची जाणीव झाल्यामुळे देशभरात शेतकऱ्यांची आंदोलने वाढतील असे त्‍यांनी सांगितले.

दरम्यान आज (मंगळवार) यात्रेचा मुख्य दिवस असल्याने चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह निपाणीचे सीपीआय बी.एस तळवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात्रेसाठी ग्रामपंचायतीने दिवाबत्तीची सोय करून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वयंसेवक हे परिश्रम घेत आहेत. दरम्यान यात्रा काळात हालसिद्धनाथ सेवा संस्थेच्यावतीने शाळा आवारात गेल्या बारा वर्षांपासून यात्रा काळात पाच दिवस मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे लाखावर भावीकांनी या अन्नछत्रात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT