पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज (दि.३१) कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केली. (Maratha Reservation Protest)
मराठा आरक्षणासाठी आणि सरसकट कुणबी दाखले मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाच्या दुसरा टप्पा म्हणून पाच दिवसापासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आज (दि.३१) आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
श्रीमंत शाहू महाराज अंतरवाली येथील उपोषणस्थळी जावून जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. या वेळी शाहू छत्रपती म्हणाले, "सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ही योग्य आहे. सरकारला आपली मागणी मान्य करावी लागणार आहे.
यावेळी जरांगे-पाटील म्हणाले की,"अर्धवट आरक्षण घेणार नाहीच. ज्यांना आरक्षण पाहिजे ते घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे सांगितलं आहे. दोन दिवसात आरक्षण मिळालचं पाहिजे. जर दाेन दिवसात आरक्षण दिल नाही तर मी पुन्हा पाणी सोडणार आहे."
चर्चेवेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी सर्व मराठा बांधवाना आवाहन केले की, " मराठा बांधवानी मनोज जरांगे पाटील यांना साथ द्यावी. त्यांना दिर्घ आयुष्य लाभो. एकत्र राहून आपला उद्देश साध्य होईल. त्यासह एकमेकांना सहकार्य करा. जाळपोळ कोण करत आहे हे माहित नाही. पण पाटील यांनी सांगितलेल्या प्रमाणे आंदोलन शांततेत करा. मराठा समाजातील कोणीही आपले जीवन संपवू नये असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे असं जाहीर केले.
हेही वाचा :