परळी : पुढारी वृत्तसेवा
परळी खोऱ्यातील सांडवली सारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असलेले सिताराम सखाराम मोरे (वय ६५) यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. गुरुवारी सकाळी ६.२० च्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये वृध्द गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परळी खोरे तसा वनसंपदेने संपन्न असा भाग असून येथे वन्य प्राण्यांचा वावरही तितकाच पाहायला मिळतो. पण अलीकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच सांडवली येथील सिताराम सखाराम मोरे हे वृद्ध गुरुवारी सकाळी ६.२० च्या दरम्यान झऱ्याचे वावर या शिवारात माकडे हाकलायला गेले होते. तेथून परतत असताना अचानकच अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या वृध्द जबर जखमी झाले.
अस्वलाने हल्ला करताच मोरे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळेस ग्रामस्थांची चाहूल लागताच अस्वलाने तेथून धूम ठोकली. मात्र अस्वलाने थेट गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. तत्काळ ग्रामस्थांनी १०८ ला कॉल केला. मात्र गाडी येण्यासाठी काही कालावधी लागणार होता. म्हणून वारसवाडी येथील दुधाच्या गाडीला बोलावून सांडवली ते पळसावडे असा सहा किलोमीटरचा प्रवास दुधाच्या गाडीतून केला. नंतर रुग्णवाहिका पळसवडे येथे पोहोचल्यानंतर तेथून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात सिताराम मोरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही घटना समजताच वनक्षेत्रपाल वन्यजीव बामनोलीचे बी. डी. हसबनीस, वनपाल वेळे डी. एम. जानकर, वनरक्षक पळसावडे ए.पी. माने, सरपंच गणेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.