Latest

नाशिककरांनो काळजी घ्या, शहरात ‘आयफ्लू’ची साथ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा अनेक संसर्गजन्य आजारांना घेऊन येत असतो. यावेळी 'आयफ्लू' (डोळे येण्याचा प्रकार) या संसर्गजन्य आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. विशेषत: लहानग्यांना या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याने, शाळेतील रोजची पटसंख्या घटली आहे. पाऊस आणि वातावरणात निर्माण होणाऱ्या ओलाव्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्‍या डोळ्यालाही संसर्ग होतो. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला काॅन्जुक्टिव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच 'डोळे आले' असे म्हणतात. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. दरम्यान, नाशिक शहरात या संसर्गजन्य आजाराने चांगलेच हातपाय पसरल्याने नेत्रविकार तज्ज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे अशा तक्रारी अधिक असून, रुग्णांमध्ये प्रामुख्याने लहानग्यांचा अधिक समावेश आहे. दरम्यान, आय फलूचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

यामुळे होऊ शकतो संसर्ग

डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसर्‍या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असे अनेकांना वाटते, त्यामुळे अनेक जण निष्काळजीपणा करतात. पण असे नाही. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात. डोळे येणे हे सामान्यत: संसर्गामुळे होते. जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत.

ही आहेत लक्षण

डोळे लाल होणे

डोळ्याच्या कडा लाल होणे

पापण्या एकमेकांना चिकटणे

डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे.

डोळ्यातून सतत पाणी येणे.

डोळ्याच्या आतले कोपरे आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येणे.

डोळ्यांतून चिकट पदार्थ बाहेर येणे

डोळ्यांना खाज येणे, डोळे जड वाटणे

तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन न होणे

अशी घ्या काळजी

डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.

डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवावेत.

प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.

कुटुंबीयांपासून दूर राहावे.

तेलकट खाणे टाळावे.

अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये.

डोळे आलेल्या व्यक्तींचे कपडे, टॉवेल इतरांनी वापरू नयेत.

घरगुती औषधोपचार करू नये.

डोळे आले असल्यास घाबरून न जाता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तीन ते चार दिवसांत हा आजार बरा होत असल्याने ॲडमिट होण्याची गरज नाही. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच लहान मुलांना लक्षणे जाणवल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.

– डॉ. नितीन रावते, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मनपा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT