Cyber fraud : तब्बल 439 एटीएम कार्ड क्लोन करून बँकेला कोटींचा गंडा | पुढारी

Cyber fraud : तब्बल 439 एटीएम कार्ड क्लोन करून बँकेला कोटींचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लोन) करून सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तब्बल 439 एटीएम (डेबिट) कार्ड क्लोन करून 1 हजार 247 ट्रान्झेक्शनद्वारे हा गंडा घालण्यात आला आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रांतून बनावट डेबिट कार्डचा वापर करून खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय 62) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर 2020 ते 2021 या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करून पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरूड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रांतून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून एक कोटी आठ लाख 15 हजार 700 रुपये लांबविले.

सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी 439 बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बनावट एटीएम कार्डद्वारे 1247 व्यवहार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वरुरे करीत आहेत. कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करून कॉसमॉस बँकेची एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना ऑगस्ट 2018 मध्ये घडली होती.

हेही वाचा :

नाशिक : सिन्नरला भरदिवसा युवकावर बिबट्याचा हल्ला

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : कडेगाव मोहरम

Back to top button