Ashes 2023 : ब्रॉडचे अ‍ॅशेसमध्ये दीडशे बळी | पुढारी

Ashes 2023 : ब्रॉडचे अ‍ॅशेसमध्ये दीडशे बळी

लंडन, वृत्तसंस्था : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes 2023) पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. अ‍ॅशेसमध्ये 150 विकेटस् घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. यामध्ये त्याने सर्वाधिक विकेटस् घेण्याच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर मजल मारली आहे. इंग्लंडने पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दुसर्‍या दिवसअखेर सर्वबाद 295 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला 12 धावांची अल्पशी आघाडी मिळाली.

स्टुअर्ट ब्रॉड अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक विकेटस् घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने 73 डावांत 151 विकेटस् घेतल्या आहेत. यादरम्यान ब्रॉडची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 8 विकेटस् आहे. यामध्ये 150 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक विकेटस् घेण्याचा विक्रम शेन वार्नच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू वॉर्नने 72 डावांत 195 विकेटस् घेतल्या आहेत. या बाबतीत मॅकग्रा दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 60 डावांत 157 विकेटस् घेतल्या आहेत.

इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. यात हॅरी ब्रुकने 85 धावांची शानदार खेळी केली. मोईन अलीने 34 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 80 षटकानंतर 7 बाद 202 धावा केल्या आहेत. सलामीवीर उस्मान ख्वाजा 157 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला. ब्रॉडनेच त्याला बाद केले. डेव्हिड वॉर्नर 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लाबुशेन 9 धावा करून बाद झाला.

इंग्लिश प्रेक्षकांनी पाँटिंगवर द्राक्षे फेकली (Ashes 2023)

ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाँटिंग मैदानावर उभा राहून थेट कॉमेंट्री करत होता. त्याचवेळी, वरील स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याच्यावर द्राक्षे फेकली. पाँटिंगला ही कृती अजिबात आवडली नाही. कार्यक्रमाच्या सूत्रधारांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, पण पाँटिंग शांत होण्यास तयार नव्हता. लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये तो म्हणाला, ‘काही लोकांनी माझ्यावर द्राक्षे फेकली. हे लोक कोण आहेत हे शोधण्यात मला काहीच अडचण नाही.’

Back to top button