पुरात वाहून गेला… रात्रभर झाडावर; 15 तासांनी सुटका | पुढारी

पुरात वाहून गेला... रात्रभर झाडावर; 15 तासांनी सुटका

कोडोली : महापुराचे पाणी पाहत असताना यांचा पाय घसरला… ते वाहून गेले… पोहता येत होते; महापूर काळ बनून आलेला… विलक्षण गतीने वाहणार्‍या पाण्याचा आवाज उरात धडकी भरवत होता… वाहत ते सुमारे 500 मीटर अंतर गेले आणि नदीपात्रात असलेल्या झाडाला अडकले… मग तब्बल 15 तास सभोवतीने रोरावत येणार्‍या महापुराच्या पाण्यात झाडाच्या फांदीवर त्यांनी रात्र जागून काढली… अखेर 15 तासांनी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

लादेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील बजरंग पांडुरंग खामकर (वय 58) यांच्या जीवावर बेतलेला हा प्रसंग. खामकर हे काखेहून मोटारसायकलवरून लादेवाडीकडे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान निघाले होते. काखे गावाजवळील कोल्हापूर-सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या वारणा नदीवरील काखे-मांगले पुलावर ते थांबले. पुलावरील लोखंडी ग्रीलवरून पुराचे पाणी पाहत असताना तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. पुराच्या पाण्याला वेग असल्याने ते काही अंतर वाहून गेले आणि नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या झाडाला अडकले. या झाडाच्या फांदीवर बसून त्यांनी संपूर्ण रात्र काढली.

शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काखे गावातील काही शेतकरी आणि पोलिसपाटील दत्तात्रय मोरे शेताकडे आले होते. त्यावेळी खामकर यांनी वाचवा, वाचवा… अशी आरोळी ठोकली. मोरे यांनी समोर पाहिले, तर झाडावर एक व्यक्ती अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खामकर यांना नाव, गाव विचारले आणि कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड व पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना पाचारण केले. जवानांनी झाडावर अडकलेल्या खामकर यांना सकाळी अकराच्या सुमारास बोटीतून सुखरूप बाहेर काढले. यावेळी नदीकाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

घटनास्थळी शिराळा तहसीलदार शामल खोत, शिराळा पोलिस ठाण्याचे जंगम व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खामकर यांची मोटारसायकल कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Back to top button