Latest

कर्नाटकात नवा वाद! ‘हलाल’ मांस विरोधानंतर आता मशिदीतील लाउडस्पीकरवर बंदीची मागणी

दीपक दि. भांदिगरे

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात (Karnataka) हलाल मांस विरोधी (anti-halal meat) मोहिमेनंतर आता बजरंग दल (Bajrang Dal) आणि श्रीराम सेना (Sri Ram Sena) आदी संघटनांनी मशिदीत (mosques) लाउडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही हिंदू गट अजान दरम्यान 'ओम नमः शिवाय', 'जय श्री राम', 'हनुमान चालीसा' पठण आणि इतर भक्ती प्रार्थना प्रसारित करण्याची योजना आखत असल्याचे समजते. या सर्व प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत.

यावर भाजपचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी, मुस्लिम समुदायाला विश्वासात घेऊनच या समस्येवर कोणताही तोडगा काढता येऊ शकतो असे म्हटले आहे. ते म्हणाले की, मुस्लिम समुदाय अजान दरम्यान लाउडस्पीकरचा वापर करण्याची प्रथा खूप पूर्वीपासून पाळत आहे. पण लाउडस्पीकरच्या आवाजामुळे विद्यार्थी, मुले आणि रुग्णांना त्रास होत आहे. मुस्लिमांनी नमाज अदा करण्यावर माझा आक्षेप नाही, पण जर मंदिरे आणि चर्चमध्येही अशाच प्रकारे लाउडस्पीकरचा वापर करुन प्रार्थना केली जात असेल, तर त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

कॅबिनेटमधील ईश्वरप्पा यांचे सहकारी सी एन अश्वथ नारायण यांनी म्हटले आहे की, सरकारने अजान संदर्भात कोणताही नवीन कायदा आणलेला नाही. "आम्ही कायद्यातील नियमांनुसार काम करत आहोत. आम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरोधात काम करत नाही."

यावर बजरंग दलाचे सदस्य भरत शेट्टी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मशिदींतील लाउडस्पीकरविरोधातील मोहीम बंगळुरातील अंजनेय मंदिरातून सुरू होईल आणि त्यानंतर ही मोहीम राज्यभर चालवली जाईल.

श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी म्हटले आहे की, सकाळी ५ वाजता लाउडस्पीकरचा वापर बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. पण बेळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. "आमचा प्रार्थनेला विरोध नाही. पण लाउडस्पीकरच्या वापराला आमचा विरोध आहे. जर मशिदींतील लाउडस्पीकर काढले नाहीत तर आम्ही रोज सकाळी भजन म्हणू," सर्वोच्च न्यायालयाने दररोज रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाउडस्पीकर वापरण्यास मनाई केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर धार्मिक तेढ वाढताना दिसत आहे. याआधी पश्चिम कर्नाटकच्या काही भागात काही बॅनर दिसले होते, ज्यावर 'मंदिर परिसरात उभारण्यात येणा-या मुस्लिमांच्या स्टॉल्सना बंदी', असे लिहिले होते.

कर्नाटकात उडुपी येथील हिजाब प्रकारणाने अवघ देश ढवळून निघाला. कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भातील याचिकांवर निकाल देताना हिजाब ही अनिवार्य धार्मिक प्रथा नसल्याचा निकाल दिला होता. या निकालाचा अनेक राजकीय नेते आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. या हिजाब वादानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक मंदिरांनी त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदूंसाठीच स्टॉल लावण्याची परवानगी मर्यादित केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT