आगामी निवडणुकांत भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड?

आगामी निवडणुकांत भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड?

मुंबई ; सुरेश पवार : आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच होण्याची शक्यता असून, वेगवेगळ्या घडामोडींतून त्याची नांदी दिसत आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोन प्रखर मुद्द्यांचा अजेंडा आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तशी व्यूहरचना केल्याचे बोलले जाते. जुन्या राजकीय परिमाणांचा प्रभाव ओसरल्याने राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या भाजपने आत्मसात केलेल्या विचारधारा अधिक प्रभावी बनल्याचे वास्तव समोर आले आहे.

अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालाच आहे. मंदिर उभारणीही झपाट्याने होत आहे. सहाशे वर्षांपूर्वीचा हा जटिल प्रश्न सोडवण्यात भाजपने पुढाकार घेतला होता आणि 'मंदिर वहीं बनायेंगे' ही घोषणा खरी करून दाखवली. हिंदू भाविकांना राम मंदिर उभारणीची अपूर्वाई वाटणे स्वाभाविकच आहे. राम मंदिराचा मुद्दा हे भाजपच्या हिंदुत्ववादी कार्डाचे पहिले पाऊल म्हटले पाहिजे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने जाती-पातीचे समीकरण जुळवतानाच हिंदुत्वाचा उघड मुद्दा पुढे आणला होता. 80 विरुद्ध 20 अशी घोषणाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलम रद्द करून काश्मीर ते कन्याकुमारी असा एकसंध देश निर्माण केल्याचा मुद्दा हिरिरीने मांडला होता.

काश्मिरी पंडितांची काश्मीरमधून कट्टर धर्मवाद्यांनी हकालपट्टी केली आणि त्यांच्या मालमत्ता हडपल्या. हजारो काश्मिरी पंडित कुटुंबे निर्वासित झाली. या घटनेवर 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत या चित्रपटाचा करमणूक कर माफ करण्यात आला आहे. हा हिंदू अनुनयाचाच भाग म्हटला पाहिजे.

कर्नाटकात 'हिजाब'वरून नुकताच संघर्ष निर्माण झाला होता. अखेर उच्च न्यायालयाने शाळेचा गणवेशच ग्राह्य धरला पाहिजे, हिजाब वापरता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला आणि त्यावर पडदा पडला. आता 'हलाल' या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकात विधानसभेची लवकरच निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशप्रमाणे भाजपने कर्नाटकातही 80 विरुद्ध 20 असा प्रचाराचा मुद्दा केला, तर आश्चर्य वाटायला नको.

मोदी यांचे समर्थ नेतृत्व हा हुकमी एक्का आहेच. त्याचबरोबर राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हे मुद्दे पुढे आणून, इतर काही पक्ष हिंदुत्वाचा दावा करतात किंवा सॉफ्ट हिंदुत्व मानणार्‍या पक्षांवर कायमस्वरूपी मात करायची, अशी भाजपच्या मातृसंस्थेची व्यूहरचना असल्याची चर्चा आहे. अलीकडेच याबाबत या मातृसंस्थेची उच्चस्तरीय नेतृत्वाची बैठक झाल्याचे आणि त्यात या व्यूहरचनेवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते.

राजकीय विचारधारा बदलली

स्वातंत्र्योत्तर पहिल्या तीस वर्षांत स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीमुळे काँग्रेसभोवती वलय होते. काँग्रेस नेते स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीचे नेते होते. त्यामुळे पहिल्या तीस वर्षांत काँग्रेसला आव्हान नव्हते. आणीबाणीनंतर चित्र बदलले. जनता पक्ष उदयाला येऊन काँगे्रसची केंद्रातील सत्ता संपली. नंतर 1984 चा अपवाद वगळता काँगे्रसला केंद्रात स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.

1991 पासून उदार आर्थिक धोरण सुरू झाले. स्वातंत्र्यलढ्याशी ज्यांचा काही संबंध नव्हता, अशी नवी पिढी पुढे आली. या पिढीला ओढ होती ती विकासाची. त्याबरोबर त्या काळात निर्माण झालेल्या हिंदुत्ववादी लाटेकडेही ही पिढी ओढली गेली. भाजपने हेच मुद्दे उचलले आणि एकेका राज्यात सत्ता मिळवीत केंद्रात प्रथम 1999 साली आणि नंतर 2014 व 2019 मध्ये सत्ता मिळवली.

1990 पूर्वीच्या राजकीय तत्त्वांचे नव्या पिढीला आकर्षण राहिलेले नाही. विकास हा परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे गेल्या शतकातील राजकीय विचार आणि तत्त्वप्रणाली बाजूला गेली असून, ती राष्ट्रवाद आणि विकासकेंद्रित झाली आहे. या विचारप्रणालीबरोबरच भाजपने बहुसंख्याकांना आकर्षित करणारा हिंदुत्ववाद अंगीकारला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपची चढती कमान राहिली आहे, हे वास्तव आहे.

पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा

भाजपने आतापर्यंत अप्रत्यक्षरीतीने हिंदुत्वाचा मुद्दा मांडलेला दिसतो. आता थेट हिंदुत्ववाद, प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्राची प्रतिमा उंचावणे अशा मुद्द्यांतून भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याचे दिसते. आर्थिक अडचणीत आलेल्या श्रीलंकेला भारताने 240 कोटी डॉलर्सची मदत केली. रशिया आणि युक्रेन युद्धात भारताची मध्यस्थी स्वीकारू, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. जपानबरोबर व्यापार करार करण्यात आला.

देशी बनावटीची शस्त्रास्त्रे निर्यातीचे धोरणही आखले गेले. त्यातून देशाची प्रतिमा अधिक उजळून निघालेली आहे आणि हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, याची खूणगाठ जनतेने बांधलेलीच आहे. जगातील प्रमुख नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा अहवाल 'मॉर्निंग कन्सल्ट' या माध्यमाने प्रसिद्ध केला आहे.

मोदी हे 71 टक्के रेटिंगने सर्व प्रमुख नेत्यांत अव्वल स्थानी असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 'टाइम' हे अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅगेझिन. त्यात जगातील 100 नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यातही मोदी अग्रभागी आहेत. मोदी यांची अफाट लोकप्रियता आणि करिष्मा ही भाजपची जमेची बाजू आहेच. त्याचबरोबर 2014 पासून आजतागायत मोदी यांच्या कारकिर्दीवर कोणाला बोट दाखवता आले नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही, हे भाजप राजवटीचे मोठे यश आहे.

बिगर भाजप राज्यांतही आक्रमक धोरणाचा परिणाम

एकविसाव्या शतकात विसाव्या शतकातील राजकीय परिमाणे मोडीत निघाल्याचे अलीकडील काही निवडणुकांतून स्पष्ट झालेच आहे. त्याचा जबरदस्त फटका काँग्रेससारख्या मध्यममार्गी पक्षाला बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी, तेलंगणात के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशात वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तामिळनाडूत स्टॅलिन आणि ओडिशात नवीन पटनायक यांनी आपापले किल्ले राखले असले, तरी भाजपने या राज्यांत चंचुप्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 18 खासदार निवडून आले, हे विसरता कामा नये. त्यामुळे आगामी काळात या राज्यांतही भाजपच्या आक्रमक व्यूहरचनेने कमळ फुलले तर नवल वाटायला नको!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news