पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध शिल्पकार अरूण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लांची मूर्ती आज (दि.१८) धार्मिक विधींसह अयोध्येतील श्री राम मंदिरातील मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली. या संदर्भातील वृत्त विश्व हिंदू परिषदेचा हवाला देत, एएनआयने दिले आहे. याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार २२ जानेवारीला पार पडणार असल्याचेदेखील परिषदेने म्हटले आहे, असेही वृत्तात सांगितले आहे.
मंगळवारी १६ जानेवारीपासून अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना सुरूवात झाली. या धार्मिक विधींचा आज तिसरा दिवस असून, आज मूर्तीस्थापनेसह, तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास यांसारखे विधी संपन्न होणार आहेत. (Ayodhya Ram Mandir Updates)
अयोध्येतील राम मंदिरात आज दुपारी १ वाजून, २० मिनिटांनी मुख्य विधींना सुरूवात झाली. दरम्यान आज राम मंदिर सोमवारी २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी विविध विधी संपन्न होणार आहेत. यामध्ये गणेशांबिकापूजन, वरुणपूजन, चतुर्वेदोक्त पुण्यवचन, मातृकापूजन, वसोर्धारपूजन (सप्तघृत मातृका पूजन), आयुष मंत्र जप, नंदीश्राद्ध, आचार्यदिचिरितविग्वरण, मधुपर्कपूजन, मंडपप्रवेश, पृथ्वी-कुर्चापूजन, पृथ्वी-कुरुणपुजन, दीपवृक्षपूजन. गव्य-प्रोक्षण, मंडपंग वास्तुपूजन, वास्तू यज्ञ, मंडप सूत्रवचन, दुधाची धारा, पाण्याची धारा, षोडशस्तंभ पूजा इ. मंडपपूजा (तोरण, महाद्वार, ध्वज, शस्त्रे, ध्वज, दिक्पाल, द्वारपालदिपूजा), मूर्तीचे जलाधिवास, गंधाधिवास हे विधी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळची पूजा आणि आरती पार पडणार आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)
बुधवारी(दि.१८) सायंकाळी उशिरा रामलल्लांची मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात आणण्यात आली होती. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लाची 'श्यामल' मूर्ती मोबाईल क्रेनच्या साहाय्याने गर्भगृहात ठेवण्यात आली. यावेळी स्वतः योगीराज उपस्थित होते. आज गुरुवारी गर्भगृहात मूर्ती स्थापित करण्यात आली.
यापूर्वी श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, बुधवारी रात्री राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली. मूर्तीच्या आसनाचे पूजन करण्यात आले. दुपारी अडीच वाजता निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुरोहित सुनील दास यांनी गर्भगृहात ही पूजा केली. गर्भगृहात प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचेही शुद्धीकरण झाले. श्री रामलल्लाच्या डोळ्यांवर आता पट्टी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, ती २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठादिनीच उघडली जाईल.