Latest

अवधूत गुप्ते म्हणाले, तिरस्काराचे चटके तुम्हालाही बसतील…काळजी घ्या

backup backup

अभिनेते विक्रम गोखले यांच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माझ्या विधानाचा विपर्यास केला, तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. ह्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या, असे म्हटले आहे. मी लोकांच्या प्रेमाचा ताजमहाल कष्टाने बांधला आहे. क्षुल्लक स्वार्थासाठी त्यावर दगड मारू नका, असे आवाहन त्याने केले आहे.

'कंगना रनौत आणि राजकीय विषयावर मला काही बोलायचे नाही पण विक्रम गोखले आम्हाला वडिलांसारखे आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य विचार करूनच बोलले असतील. ते मोठे कलाकार आहेत. ते एक मोठे कलाकार आणि विचारवंत आहेत. त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे ते आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत.' असे वक्तव्य अवधूत गुप्ते याने केले होते. त्यावर सोशल मीडियातून प्रचंड टीका झाल्यानंतर त्याने आपली बाजू मांडली आहे.

त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'आधी दुर्लक्षित करावे असे वाटले होते. पण, काही मित्र अजूनही नाराज आहेत, असे वाटते, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम 'मी ह्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत' असे सांगितले असता अधोरेखित शब्दांची जागा हेतूपुरस्सर बरोबर उलटी करुन, माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढणाऱ्या सर्व माध्यमांना मानाचा मुजरा. एवढेच सांगेन, की लोकांच्या प्रेमाचा हा ताजमहाल मी अतिशय कष्टाने कण-कण जमवून बांधला आहे.

माझ्यासाठी त्यांचे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही हजार व्ह्यूजच्या क्षुल्लक स्वार्थासाठी प्लीज त्यावर दगड मारू नका. ही मराठी चित्रपट सृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक 'मामा', विक्रम 'काका' अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.

ह्याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंड वर करून सांगणे बरोबर ठरेल काय? त्यांच्या काळात त्यांनी नाटकापासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या कलेने मराठी रसिक वर्ग घडवला आणि वाढवला, ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही आणि मराठी रसिकवर्ग ठरवूनही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही.

राहता राहिला हा संपूर्ण वाद ज्यामध्ये पडायची माझी अजिबात इच्छा नाही. ह्याचा अर्थ माझ्याकडे सजगता नाही, असा अजिबात होत नाही. पण, माझ्याकडे माझी स्वतःची संगीत आणि चित्रपट अशी चिरंतन टिकणारी माध्यमे असताना ह्या क्षणभंगुर समाज माध्यमांतून आणि वृत्तसंस्थाना काहीतरी विधाने देऊन मी का व्यक्त होऊ? आणि आजवर मी त्याच माध्यमातून व्यक्त होत आलेलो आहे. चित्रपट 'झेंडा' पासून 'जात' गाण्यापर्यंत सर्व उदाहरणं तुमच्या समोर आहेत.

बाकी, माझ्यावर आरोप करणाऱ्या मित्रांनी सांगावे, की ह्या बातमीवर जितक्या तत्परतेने प्रतिक्रिया दिलीत किंवा शेअर केलीत तितक्याच तत्परतेने माझे 'जात' हे गाणे शेअर केले होते का?. माझी खात्री आहे की माझ्या ह्या मित्रपरिवारातील ९९ टक्के माणसे ही अतिशय समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारी, माणुसकीला जपणारी अशीच सुसंस्कारी आहेत. बाकीच्या मित्रांना एवढीच विनंती. की तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. ह्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या.'

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT