पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांनी टिकली लावण्यावरून घमासान सुरु असताना मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade ) हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी…' या हेडिंगखाली तिने भली मोठी पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय. सोबतचं तिने आपल्या आईसोबतचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये दोघीही साडी नेसलेल्या दिसताहेत. दोघीही हसतानाही दिसतात. (Ashvini Mahangade )
अश्विनीने पोस्टमध्ये म्हटलंय- ''काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मला सुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे.
कदाचित #लोक_काय_बोलतील हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्या सुद्धा मनात आला. पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार #पुरला. ती आधीसारखीच गोड दिसत होती.. पण काहीतरी कमी होते. काय? तिचे कपाळ.
या आधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते न.. मग. पण ती ऐकायची फक्त.
आई कुठे काय करते मध्ये अनघा एकदा म्हणाली होती की लग्नाच्या आधी सुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे…मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असे सारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती.
आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई..टिकली लावू का ग?
आधी आणि आता सुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो आणि आज #लोक_काय_बोलतील या विचारात तिने मला विचारावे?
मी क्षणात म्हणाले लाव की. त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली.
रुचिका (भावा) ने तिचे, आमचे मनसोक्त फोटो काढले आणि दीड वर्षानंतर आम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडलो.
काल आणखी एक अप्रतिम गोष्ट घडली. आम्ही आमच्या छकुलीचा वाढदिवस साजरा केला. काल दीड वर्षानंतर पहिल्यांदा मम्मीने कुंकू हातात घेतले, छकुलीला ओवाळले. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे असे मी मानते.
#लोक_काय_बोलतील यापेक्षा आता तिने तिला सांभाळावे, ज्यात खंड पडला त्या गोष्टी अनाहूतपणे होत असतील तर कराव्या. तिने आनंदी राहावे. #नाना देव होते आमच्या घराचे. ते कधी, कसे विसरता येईल.
तुमच्या आईला थोडा विश्वास देण्याची गरज आहे, एकदा मिठी मारण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आता आपण मोठे झालो आहोत तर कधीतरी त्यांचे लाड देखील करण्याची गरज आहे.
?फक्त प्रेम आणि आदर?"
अश्विनीने आई कुठे काय करते मालिकेत अनघा हे पात्र साकारले आहे.