मुंबई: पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले जाणार आहे. तर राज्यसभेसाठी भाजप एक जादा उमदेवार देणार आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि यांना भाजपने आज (दि.१४) राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. Rajya Sabha Election
नारायण राणे व अशोक चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये असल्यापासून वितुष्ट होते. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्याने राणेंनी त्या काळी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर तब्ब्ल ८० दिवस राणे मंत्रिमंडळाबाहेर होते. ८० दिवसांनंतर उद्योगमंत्रिपद देऊन राणेंना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते. एकेकाळचे राणेंचे काँग्रेसमधील विरोधक भाजपमध्ये आल्यामुळे राणेंनी मंगळवारी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राणे आणि गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे राणेंना सांगण्यात आल्याचे समजते. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तर पीयुष गोयल यांना मुंबईमधून लोकसभेची उमदेवारी दिली जाणार आहे. Rajya Sabha Election
दरम्यान, राज्यसभेसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे कायम असून यात अशोक चव्हाणांच्या नावाची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपला एक उमेदवार घेणार आहे; तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही एक उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँगेसमध्ये फाटाफूट करून भाजप चौथी जागा जिंकण्याच्या तयारीत आहे.
राज्यसभेच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थाने रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. काँग्रेसमधून नुकतेच एनसीपीत प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची या बैठकीत चर्चा होती.
तर समीर भुजबळांना संधी द्यावी, यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेसुद्धा आग्रही असल्यामुळे उमेदवारीबाबतची चर्चा लांबतच गेला. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेले नाही. भुजबळ हे त्यांचे पुतणे समीर यांच्यासाठी फील्डिंग लावत असले तरी मराठा आरक्षणावरून त्यांच्या बाबत असलेली नाराजी पाहता राज्यसभेसाठी समीर यांचा विचार केला जाणार नाही. नाकेबंदी केलेली असताना आता कोणता नेता आर्थिक रसद पक्षाला पुरविणार हाही प्रश्न आहे. अशा सगळ्या विवंचनेत काँग्रेसचे आमदार पडले आहेत.
हेही वाचा