नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजस्थानमधून सोनिया गांधी, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे तर हिमाचल प्रदेशमधून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि बिहारमधून डॉ. अखिलेश प्रताप सिंह आणि यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Chandrakant Handore )
गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थ्यामुळे राज्यसभेवर जातील अशा चर्चा होत्या. विविध काँग्रेसशासित राज्यातून तसे प्रस्त्वावही देण्यात आले होते. काँग्रेस पक्षनेतृत्वाने मात्र सोनिया गांधींसाठी राजस्थानची निवड केली. दरम्यान सोनिया गांधी यांनी बुधवारी सकाळी जयपुरमध्ये पोहोचल्या आणि राजस्थन विधीमंडळात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेसने नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट उपस्थित होते. काँग्रेस पक्ष नेतृत्वाने सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनिया गांधींच्या रायबरेली लोकसभा क्षेत्रातून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात दोन वर्षांपुर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील काही मते फुटल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्या पराभवानंतर अनेक चर्चाही झाल्या होत्या. काँग्रेस नेतृत्वाने पुन्हा एकदा चंद्रकांत हांडोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे.
बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेले डॉ. अखिलेश प्रसाद सिंह हे बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते लोकसभा आणि राज्यसभेचेही सदस्य होते. पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे. तर हिमाचल प्रदेशमधुन ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिषेक मनू सिंघवी काँग्रेसची न्यायिक बाजू भक्कमपणे मांडत असतात. यापूर्वीही ते राज्यसभेवर होते, पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच मुंबई काँग्रेस मधील महत्त्वाचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्या पाठोपाठ माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई काँग्रेस खिळखिळी झाली असताना मुंबईतून काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली असण्याची शक्यता आहे. चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले आणि अनुभवी नेते आहेत. चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मधील एक प्रमुख दलित चेहरा आहेत. महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय मंत्री राहिलेले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. चंद्रकांत हंडोरे यांच्या माध्यमातून मुंबई काँग्रेससह राज्यात पक्षाला बळ देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने दलित समीकरण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हंडोरे यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजीही होती. राज्यसभेची उमेदवारी देऊन एक प्रकारे ही नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.
हेही वाचा