शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी | पुढारी

शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार असलेले देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

देवरा यांच्या रूपाने शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी तगडा उमेदवार मिळाल्याचे मानले जात होते. मात्र ते शिंदे गटातून राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. देवरा यांची उमेदवारी शिंदे गटासाठी फायदेशीर असून दक्षिण मुंबईतील शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून उमेदवारी

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, डॉ. जशवंतसिंह सलामसिंह परमार यांना गुजरातमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले जाणार आहे. राज्यसभेला भाजप एक जादा उमदेवार देत आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button