नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबमधील अधिकाऱ्यांबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक बैठक झाली. या बैठकीवरून राजकारण तापले आहे. केजरीवाल यांचे जुने सहकारी आणि पत्रकार आशुतोष यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, अरविंद केजरीवाल यांना पंजाब चालवायचा असेल तर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
दिल्लीचे मुख्यमंत्री असताना पंजाबमधील अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे असंविधानिक आहे. याशिवाय ही पंजाबसाठी चांगली बाब नाही. अरविंद केजरीवालांना पंजाबमध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर निवडणूक लढवून मुख्यमंत्री बनले पाहिजे, असे आशितोष म्हणाले आहेत. पंजाबमधील विरोधी पक्षांनीही या बैठीकीवर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, राज्यातील सरकार दिल्लीतून रिमोट कंट्रोलद्वारे चालवण्यात येत आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भगवंत मान यांच्यावर टीका केली आहे. भगवंत मान हे 'रबर स्टँप' असल्याचे अमरिंदर सिंग म्हटले आहेत. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थितही नव्हते.