पुढारी ऑनलाईन : एका ॲटोरिक्षावाल्याच्या घरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भोजन केले. यानंतर भाजपने कलाकार म्हणत त्यांच्यावर टीका केली. पण ज्या ॲटोरिक्षाचालकाच्या घरी केजरीवाल यांनी भोजन केले, त्याचे कुटुंब हे गेल्या वर्षापासून भाजपचे समर्थक होते.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मतदारसंघातील विक्रम दंतानी हे ॲटोरिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंब हे कित्येक वर्षांपासून भाजपलाच मतदान करत आहेत, परंतु लॉकडाऊन आणि महागाईमुळे आता त्यांना या गोष्टीचा विचार करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अहमदाबाद येथील २७ वर्षीय ऑटोरिक्षा चालक विक्रम दंतानी सोमवारी संध्याकाळपासून माध्यमांमध्ये चर्चेत आले. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल काही आप नेत्यांसोबत पोलिसांच्या ताफ्यासह देवीपूजक दंता यांच्या थेट घरी पोहचले. यावर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची खरडपट्टी काढली आणि त्यांना 'कलाकार' म्हटले.
दंतानी यांचे घर अहमदाबादच्या घाटलेदिया विधानसभा मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. घाटलोदिया मतदारसंघातून स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल प्रतिनिधित्व करतात. घाटलोदिया विधानसभा मतदारसंघ गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येथील खासदार आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पक्षाला लोकांची पसंती असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत.