पाऊस थांबला अन पालिकेची अब्रू वाचली…….. पुणेकर संकटात असताना राजकीय पक्ष गुंतले राजकारणात | पुढारी

पाऊस थांबला अन पालिकेची अब्रू वाचली........ पुणेकर संकटात असताना राजकीय पक्ष गुंतले राजकारणात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे शहरात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा 25 सप्टेंबर 2019 सारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाला आणि महापालिकेची अब्रू वाचली. एकीकडे पुणेकर संकटात असताना राजकीय पक्ष मात्र कुरघोडीच्या राजकारणात गुंतले आहेत. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याची कबुली अधिकार्‍यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात कमी जास्त पावसाची हजेरी लागत आहे. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार आणि दमदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक बैठ्या घरांमध्ये आणि सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडल्या. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडालेली असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेले फोन नंबरही आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकार्‍यांचे मोबाईल लागत नव्हते. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून तीन महिन्यांपूर्वी नालेसफाई, पावसाळी लाईनची सफाई करण्यात आली होती.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही कामे कशी झाली, कोणत्या दर्जाची झाली असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वत्र पावसाचे पाणी साचल्याने आणि शहरातील ओढे व नाल्यांना पुन्हा 2019 सारखा पूर येतो की काय, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. आणखी अर्धा तास पावसाचा जोर कायम राहिला असता, तर पुन्हा 25 सप्टेंबरसारखा हाहाकार पाहायला मिळाला असता.

ही परिस्थिती का उद्भवली ?
शहरातील नाल्यांवर आणि ओढ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.
नाल्यालगत सीमाभिंत बांधून बांधकाम करण्यास परवानग्या देण्यात आल्या, परिणामी नाल्यांची रुंदी कमी झाली.
पावसाळी व ड्रेनेज लाईन साफसफाई केल्यानंतर राडारोडा उचलला जात नाही. पाऊस पडल्यानंतर तोच राडारोडा पुन्हा लाईनमध्ये जातो.
नवीन ड्रेनेजलाईन टाकल्यानंतर त्या अनेक ठिकाणी पावसाळी लाईनला जोडल्या आहेत.
स्मार्ट रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही पावसाचा अभ्यास करण्यात आलेला नाही.
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे प्रमाण वाढले.
पाण्याचा अंदाज न घेता चेंबरच्या जाळ्या सोडण्यात आल्याने जाळी व आणि पाणी साचणारा भाग खाली, असे अनेक ठिकाणी चित्र आहे.

राजकीय पक्षांमध्ये कुरघोडी
लहान मोठ्या पावसांमध्ये शहरातील रस्त्यांवर पाणी साचत आहे, रस्त्यांवर खड्डे पडत आहेत, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे, या परिस्थितीमुळे पुणेकर वारंवार संकटात सापडत असताना, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत. सत्ताधारी-विरोधक एकत्रित येऊन निधी संपविण्यासाठी नियोजन न करता कामे करण्यास प्रशासनाला भाग पाडतात. निधी संपल्यावर कामे अपूर्ण ठेवतात. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यावर मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.

पूरस्थितीनंतर मंगळवारी, बांधकाम विभाग, पथ विभाग, तसेच ड्रेनेज विभागाची बैठक बोलविण्यात आली होती. पूरस्थितीला नाल्यांवरील अतिक्रमणेच जबाबदार असल्याचे आढळले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांवर, नाल्यांच्या बाजूला तसेच नाला वळवून बांधकाम करण्यास मान्यता दिलेल्या बांधकामांचा तसेच नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
                                       – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

 

शहरात आम्ही पाहणी केली असून, त्यानुसार चर्चाही झालेली आहे. त्या अनुषंगाने ड्रेनेज विभाग आणि पथ विभागाला तातडीने रस्त्यावर पाणी साचल्यास त्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ही पथके असणार असून, ती 24 तास कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, शहरात ज्या ज्या भागात पाणी घुसले, त्याचा अहवाल परिमंडळ उपायुक्तांकडून मागविण्यात आला असून, त्यानुसार पाणी साचू नये, यासाठी अल्पमुदतीची तसेच दीर्घ मुदतीची कामे केली जाणार आहेत. त्याचा आराखडा पुढील आठवडाभरात तयार केला जाणार आहे.
                          – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

 

Back to top button