रविवारी मध्यरात्री अणुस्कुरा घाटातील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक किरकोळ प्रमाणात दरड कोसळल्याने बंद पडली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटविली अजून आज सकाळ पासून अणुस्कुरा मार्गे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.
कोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटांपैकी केवळ अणुस्कुरा घाटमार्गेच सर्व प्रकारची वाहतूक सुरु आहे. सध्या या घाटमार्गे रत्नागिरी, लांजा, देवरुख यासह राजापूर आगाराच्या एसटी सेवेसह, मालवाहतूक, पेट्रोल, डिझेलसह गॅसचे टँकर, घरगुती सिलेंडरची वाहतूक, जळाणासाठी लाकडाची वाहतूक याच मार्गाने सुरु आहे.
याचबरोबर खाजगी वाहने याच घाटमार्गे ये – जा करीत आहेत. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक वाढली आहे. असे असतानाच रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक बंद पडली होती.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाने तात्काळ यंत्रणा लावून घाटात कोसळलेली दरड हटवून घाटातील वाहतूक सुरळीत सुरु केली. सकाळी राजापूर आगारातून सुटलेली पुणे बस घाटातून पुढे मार्गस्थ झाली.
त्यानंतर घाट मार्गे सुरळीत वाहतूक सुरु झाली होती. सोमवारी काही वाहने घाटमार्गे ये – जा करताना दिसली दरम्यान घाटातील रस्ता खराब झाला असून काही ठिकाणी खड्डे पडल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.