रायगड, पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९५ वी जयंती आज (सोमवार) किल्ले रायगडसह महाड तालुक्यात मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. वैशिष्ट्य म्हणजे महिला वर्गाचा सहभाग यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऐतिहासिक खर्डी गावातील महिलांनी किल्ले रायगडावर जाऊन आज भल्या पहाटे शिवज्योत आपल्या गावी नेली. तर यावेळी एका ८० वर्षाच्या वृद्धेने शिवज्योत आणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
खर्डी गावातील फौजी प्रशांत गोविंद राजेमहाडिक व फौजी प्रशांत भरत राजेमहाडिक यांच्या पुढाकाराने सुमित्रा गोविंद राजेमहाडिक (वय ८०) निर्मला यशवंत कदम (वय ५९) यांच्यासमवेत श्वेता संतोष भोसले, शिल्पा गोपीचंद राजेमहाडिक, पूनम प्रशांत राजेमहाडिक, कल्पिता समीर दळवी, सुचिता संदेश राजेमहाडिक, संगीता दिनेश मोहिते, शोभा पांडुरंग राजेमहाडिक, स्वाती अरूण घारे, रुपाली हरीश कदम, दिपाली प्रशांत राजे महाडिक, सारिका रामचंद्र राजेमहाडिक, शिवकन्या मेहेक आणि वैभवी तसेच छोटे मावळयांनी शिवज्योत आणली.
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, चालू वर्षी शासनाने सर्व निर्बंध उठवल्याने महाड तालुक्यातील १३४ गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात व वाद्यांच्या गजरात साजरी होत आहे. सकाळपासूनच शिवज्योत गावातील आणली जात आहे.किल्ले रायगडावरून सुमारे २५० पेक्षा जास्त शिवज्योत सकाळी ५ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत गावांकडे नेल्या जात होत्या. यामध्ये विविध शिवप्रेमी संस्थांचा तसेच गावांतील महिला वर्गाची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत होते.
ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी किल्ले रायगडावरून महिलांनी आणलेली शिवज्योत खर्डी गावी नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती व्यवस्था केली होती. रायगड विभागासह माण तालुक्याच्या विविध गावांतून महिला वर्ग शिवजयंती उत्सवात सक्रिय दिसून येत आहे. याबद्दल सर्वत्र महिलांचे कौतुक होत आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie