भारत-ऑस्ट्रेलिया संबंधात मोठी सुधारणा ; पंतप्रधान मोदी | पुढारी

भारत-ऑस्ट्रेलिया संबंधात मोठी सुधारणा ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या संबंधात गेल्या काही काळात मोठी सुधारणा झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोन्ही देशांदरम्यानच्या शिखर संमेलनात (Shikhar Sammelan) बोलताना केले. आभासी मार्गाने झालेल्या शिखर संमेलनाच्या उद्घाटनास ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हेही उपस्थित होते.

गतवेळच्या शिखर संमेलनावेळी दोन्ही देशांची भूमिका ‘धोरणात्मक भागीदारी’ अशा स्वरूपाची होती. मात्र आता दोन्ही देशांदरम्यान वार्षिक परिषदा घेण्यासंदर्भात एक व्यवस्था तयार झाली आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षात दोन्ही देशांचे संबंध मोठ्या प्रमाणात सुधारले आहेत.

व्यापार – गुंतवणूक, संरक्षण – सुरक्षा, शिक्षण आणि इनोव्हेशन, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात दोन्ही देश हातात हात घालून काम करीत आहेत. इतकेच नव्हे तर क्रिटिकल मिनरल्स, जल व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, कोविडविषयक संशोधन आदी क्षेत्रात दोन्ही देश समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

बंगळुरू येथे उभारले जात असलेले सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतातून विविध मार्गांनी ऑस्ट्रेलियात पोहोचलेले पुरावशेष परत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आपण पंतप्रधान मॉरिसन यांचे आभार मानतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button