Latest

Amit Shah : त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठात अमित शाह करणार योग दिवस साजरा

गणेश सोनवणे

नाशिक/त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
भारताचे गृह आणि सहकारमंत्री अमित शाह जागतिक योगदिनी म्हणजेच 21 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या गुरुपीठावर येणार असून, अमित शाह यांच्या हस्ते विविध उपक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांच्या तयारीबाबत शनिवारी (दि. 11) दिवसभर विविध केंद्रीय व स्थानिक सरकारी यंत्रणांनी आढावा घेतला.

एप्रिल 2022 मध्ये स्वामी सेवामार्गाच्या करोडो सेवेकर्‍यांच्या वतीने चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ. दिकपाल गिरासे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्ग संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुमारे 10 हजार केंद्रांच्या माध्यमातून करीत असलेल्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. त्याचवेळी समर्थ गुरुपीठाला भेट देण्याची विनंतीही केली होती. सेवामार्गाच्या या विनंतीला मान देऊन शाह हे जागतिक योगदिनी त्र्यंबकेश्वरनगरीत समर्थ गुरुपीठात येत आहेत.

जागतिक योग दिन तसेच सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळा हा मंत्रिमहोदय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याने आणि राज्याचेही अनेक मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याने, याबाबत तयारीचा आढावा विविध यंत्रणांनी घेतला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक दर्शनलाल गोला, राकेश कुमार, वरिष्ठ अधिकारी पारस नाथ, योगेश कुमार, स्वप्नील पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कीर्तिका नेगी, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, मंडळाधिकारी अनिल रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफाळ व इतर अधिकारी आढावा घेण्यासाठी उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, ना. दिलीप वळसे पाटील, ना. बाळासाहेब थोरात, ना. आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT