Latest

अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ने ‘शोले’चाही मोडला होता रेकॉर्ड!

स्वालिया न. शिकलगार

स्वालिया शिकलगार; पुढारी ऑनलाईन : आज २३ सप्टेंबर अभिनेत्री अलका कुबल यांचा वाढदिवस. त्यांच्या असंख्य चित्रपटांपैकी एक गाजलेला चित्रपट माहेरची साडी होय. १९९१ साली माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. आजही अलका कुबल यांच्या माहेरची साडी टीव्हीवर लागला की, आपला रिमोट  त्याच चित्रपटाजवळ येऊन थांबतोचं. माहेरची साडी प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ असलेला चित्रपट आहे. खासकरून तमाम मराठी महिलांच्या हृदयात या चित्रपटाने स्थान मिळवलं आहे.

सासूरवासाने ओलांडली मर्यादा

१९९१ साली माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सासूकडून सूनेचा होणारा छळ, सासूच्या सगळ्या गोष्टी ऐकणारा नवरा आणि त्यातून आलेले दु:ख. लग्नाआधी माहेरी आणि लग्नानंतर सासरी सुख म्हणजे काय, हे जरादेखील न अनुभवणारी सुहासिनी चित्रपटात दाखवण्यात आलीय.

पैशाचा हव्यास असणारी सासू कशाप्रकारे सुनेचा छळ करते. प्रत्येक गोष्टीत तिला आई-वडिलांवरून टोमणे मारते. मारहाण करते. आणि हे सर्व निमूटपणे, निर्दयीपणे पाहणाऱ्या नवऱ्यापुढे हतबल झालेली बायको. शेवटी तिच्या नशीबात केवळ आणि केवळ आलेलं दु:ख. याचं वास्तव चित्रण चित्रपटात दाखवण्यात आलं होतं.

माहेरी असताना बापाची माया मिळत नाही. पण, जीवापाड प्रेम करणारा भाऊ असतो. सासरी नवरा आणि सासू छळ करते. पण, तिची प्रत्येक गोष्ट समजून घेणारी नणंद असते.

अलका यांच्यासोबत चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

या चित्रपटातील अलका कुबल यांचं 'नेसली माहेरची साडी' डोळ्यात अश्रू आणणारं होतं.

'माझं छकुलं छकुलं' हे गाणंदेखील हिट झालं होतं.

माहेरची साडी -२ येणार

माहेरची साडी चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार, याची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली होती. मीडिया रिपोर्टनुसार माहेरची साडी चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे, असे म्हटले जात होते. दिग्दर्शक विजय कोंडके याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती करणार आहेत, असंही म्हटलं जात होतं.

बालकलाकार म्हणून काम

अलका यांनी वयाच्या आठव्या वर्षी अभिनय करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सम्राट हे त्यांनी व्यावसायिक नाटक केलं. दत्ता भट, शांता चौगुले यांच्यासोबत अलका यांनी जवळजवळ २५० नाटकाचे प्रयोग केले.

वेडा वृंदावन नाटकात यशवंत दत्त यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. बालकलाकार म्हणून ८ ते १२ या वयात काम केलं होतं.

यत्ता दहावीत असताना नसरूद्दीन शहा आणि स्मिता पाटील यांच्या चक्र या हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यांनी आईकडे हट्ट धरला होता की, या चित्रपटात त्यांला काम करायचंय. मी सेटवर अभ्यास करेन, असं सांगून अलका यांनी चित्रपटात संधी मिळवली.

दहावीची मार्चला परीक्षा होती. त्या सेटवर अभ्यास करायच्या. ६८ टक्के मिळाले. १९८१ ला त्या दहावीची परीक्षा पास झाल्या. त्यांचा या चित्रपटात २ मिनिटांचा रोल होता.

अलका या चक्र चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना स्मिता यांचं काम पाहायच्या. कॅमेऱ्याजवळ बसून राहायच्या. स्मिता पाटील त्यांची आवडती अभिनेत्री आहे. स्मिता यांच्यासोबत काम करत त्यांच्या अभिनयाची सुरूवात झाली.

'हा' होता पहिला चित्रपट, पण…

अलका यांनी सर्वात आधी एक राजस्थानी, एक गुजराती चित्रपट केला. त्यानंतर पहिला मराठी चित्रपट केला-पोरींची धमाल, बापाची कमाल. पण हा जरी पहिला चित्रपट असला तरी ते नंतर रिलीज झाला होता.

त्याआधी लेक चालली सासरला-हा त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला. पोरींची धमाल, बापाची कमाल या चित्रपटाचे शूटिंग आधी झाले होते.

गोल्डन ज्युबिली माहेरची साडी

अलका यांनी माहेरची साडी रिलीज झाल्यानंतरचे अनुभव सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या-'मी जेव्हा जत्रेत जात होते. तेव्हा बायका प्रेमापोटी अक्षरश: माझा हात धरायला बघायच्या. मला स्पर्श करायला बघायच्या. त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. मीठ आणि मिरच्यांनी माझी दृष्ट काढायच्या.'

गोल्डन ज्युबिली

माहेरची साडी १२७ आठवडे पुण्यात चालला. ५० आठवडे गोल्डन ज्युबिली, सिल्व्हर ज्युबिली ठरला.

माहेरची साडीला कुठल्याही पध्दतीची जाहिरात करावी लागली नाही.

एका मराठी चित्रपटाचे हे अभूतपूर्व यश हाेते.  एकेकाळच्या सुपरहिट शोले चित्रपटाचा रेकॉर्ड माहेरची साडीने मोडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT