Latest

Ajit Pawar News : कंत्राटी भरतीच्या निर्णयाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले..

अमृता चौगुले

पुणे : राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 'आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवत कारण नसताना मला ट्रोल करायचं काम चालू आहे,' अशा टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

संबंधित बातम्या :

मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून, एका कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून, यापैकी 2 लाख 40 हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर होतो, असं विधान अजित पवारांनी केले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली होती.

पवार म्हणाले, कंत्राटी पदभरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये. आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान अनेक ठिकाणी स्टाफ कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्टाफ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतले आहे. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचे काम करत आहेत.

राष्ट्रवादी कोणाची; बाजू मांडणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावर पवार यांनी निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावले ते जाणार आहेत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार आहोत. आज (दि.16) मंत्रिमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मीदेखील संभाजीनगरमध्ये जाणार असल्याचे सांगत पवार म्हणाले, संभाजीनगरमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. मराठवाड्यात पावसानं ओढ दिली आहे. अनेक भागांत शेतकर्‍यांची पिके करपून गेली आहेत. राज्यातही काही भागांत अशी स्थिती आहे. हवामान विभागाने आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीस विरोध

राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने नोकरभरतीच्या काढलेल्या आदेशास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा विरोध असून, सरकारविरोधात लोकांची मानसिकता असूनही सरकारला याचे गांभीर्य नसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. कायमस्वरूपाच्या नोकर्‍या कमी होणार नाहीत, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या असतात, तेथे कंत्राटी कर्मचारी नेमणे चुकीचे आहे. जिथे अत्यंत आवश्यक असेल तेथेच असा निर्णय व्हायला हवा, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर निवडणूक आयोगाकडे 6 ऑक्टोबरला सुनावणीमध्ये आम्ही आमची बाजू मांडू. आम्ही निवडणूक आयोगाला हा वाद नाही. त्यासाठी आमची बाजू ऐकून घ्यावी. आमची बाजू ऐकून न घेता हा निवडणूक आयोगाने डिस्पूट आहे, असे एकदम जाहीर केले आहे. याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT