Latest

Afghanistan Crisis : अजित डोभाल करणार रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशी चर्चा

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Afghanistan Crisis : तालिबानच्या कब्जानंतर अफगाणिस्तानातले संकट दिवसेंदिवस वाढत चाललेले असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे बुधवारी रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाई पेत्रुशेव यांची भेट घेणार आहेत.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी येथे दिली. तालिबानला अफगाणिस्तानला परत आणण्यात पाकिस्तान आणि चीनबरोबरच रशियाने मदत केली होती.

मात्र तालिबानने घातलेल्या हैदोसामुळे रशिया चिंतीत आहे. तालिबानमुळे केवळ भारतच नव्हे तर रशियातही दहशतवाद पसरु शकतो, अशी भीती अलिकडेच भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेलव यांनी व्यक्त केली होती.

नॉदर्न अलायन्सला पराभूत करुन पंजशीर प्रांतावर कब्जा केल्याचा दावा तालिबानने केलेला आहे. दुसरीकडे नॉदर्न अलायन्सने तालिबानचा हा दावा खोडून काढला आहे. तिकडे काबूलमध्ये नवे सरकार स्थापन करण्यातही तालिबानला अडथळे येत आहेत.

अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याच्या स्मृतीदिनी म्हणजे ११ सप्टेंबरला तालिबानकडून सरकार स्थापन केले जाण्याची शक्यता आहे. सरकार स्थापनेवेळी रशिया, चीन, पाकिस्तान, तुर्की, इराण आणि कतार या मोजक्या सहा देशांना तालिबानने निमंत्रण दिलेले आहे.

एकीकडे रशियाचे तालिबानसोबत संबंध मजबूत झालेले असताना दुसरीकडे भारताने सावध पवित्रा घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर डोभाल आणि पेत्रुशेव यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT