पुणे : पुढारी वृत्तसेवा
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्या व प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील वारंवार गुन्हे करणार्या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (24, रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त नामेदव चव्हाण यांनी मोका कारवाईला मंजुरी दिली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 64 वी कारवाई आहे.
आल्हाटसह त्याचे साथीदार शंभू बालाजी कावळे (22) आणि कण भाऊसाहेब राखपसरे (22, दोघेही रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आल्हाट, कावळे आणि राखपसरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे व अमंलदार उमेश धेंडे, सुर्या जाधव यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर बारकाईने लक्ष देऊन गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याबरोबरच गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकार्यांना सुचित केले होते. त्यानुसार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 64 वी कारवाई आहे.
हे ही वाचा :