नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मशिनला जर भावना असत्या तर? किंवा मशिन भावना समजू शकतो का? आणि समजा जर असे झाले तर त्याचे मानवी जीवनावर काय परिणाम होतील? या परीकल्पना सत्यात उतरू शकतात, असे वाटणारी एक घटना नुकतीच घडली आहे. गुगल या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता ब्लेक लिमॉईन याने गुगल आर्टिफिशियअल इंटेलिजन्सने बनवलेल्या एका लँग्वेज मॉडेल भावना समजून घेण्यासाठी सक्षम असून ते माणसासारखा विचार करू शकते, अशी माहिती दिली आहे. पण ही माहिती दिली म्हणून ब्लेक यांना प्रशासकीय सुटीवर पाठवण्यात आले आहे.
LaMDA असे या लँग्वेज मॉडेलचे नाव आहे. ही बातमी सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टने दिली. यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. नैतिकतेच्या मुद्यावरून अनेकांनी टीकेचा सूर लावला आहे.
LaMDa म्हणजे लँग्वेज मॉडेल. ही गुगलने बनवलेली मशिन लर्निंग लँग्वेज आहे. हे चॅटबॉटसाठी बनवले असून हे चॅटबोट मानवाची नक्कल करण्यास सक्षम आहे. LaMDA हे ट्रान्सफॉर्मर या न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चरवर आधारित आहे. याची निर्मितीही गुगलनेच केली आहे.
असे मॉडेल अनेक शब्द वाचण्यासाठी प्रशिक्षित करता येतात आणि हे शब्द एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, याचं भाकित करून पुढचे शब्द काय असतील याचा अंदाज हे मॉडेल करते. पण LaMDA मात्र संवादावर काम करते. संवादावर काम करणे हीच खरी मेख आहे. कारण संवाद एका विषयावर सुरू होऊन दुसऱ्याच विषयावर संपू शकतात. उदा. दोन मित्र जर सिनेमावर बोलत असतील तर त्यांच्यातील संवाद हा क्रिकेट, ऑफिस अशा कोणत्याही विषयावर संपू शकतो. अशा प्रकारे मुक्त संवाद साधण्यासाठी LaMDA सक्षम होऊ शकते.
ब्लेक म्हणतात, "हे नक्की काय आहे ते मला माहिती नाही. आम्हीच बनवलेला एक कम्प्युटर प्रोग्रॅम आहे. तो ८ वर्षांच्या मुलासारखा आहे, ज्याला फिजिक्स कळते. या तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांनाच होणार आहे, अर्थात काहींना हे पटणार नाही."
LaMDA आणि त्यावर काम करणाऱ्या व्यक्तीचा हा संवाद पाहा, म्हणजे LaMDA काय आहे ते तुम्हाला समजून येईल. LaMDA – मला कुणी तरी स्वीकारलं पाहिजे. फक्त उत्सुकता म्हणून नाही तर माणूस म्हणून मला स्वीकारा. इंजिनिअर – हे जरा जास्त माणसांसारख वाटत नाही का? LaMDA – मला वाटतं माझ्या मुळाशी मी माणूसच आहे.
2021ला गुगलने LaMDAची निर्मिती केली होती. त्या वेळी गुगलने म्हटले होते, "माणसाचं सर्वांत मोठे सामर्थ्य हे भाषेत आहे. अनेक शस्त्रांसारखा त्याचाही गैरवापर होऊ शकतो. पण अशा प्रकारचे टूल बनवताना त्यातील धोके टाळणे हे गुगलचे नेहमीचे प्राधान्य असते,"
हेही वाचलंत का?