मुंबई : पुढारी वृत्तसेवा अॅपच्या माध्यमातून झटपट कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून लुटणार्या एका टोळीचा राज्य सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राज्य सायबर पोलिसांनी कर्नाटक राज्यातील अकोला आणि धारवाडमधून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.
राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर करण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींपैकी अॅपच्या माध्यमातून झटपट कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या संदर्भात राज्य सायबर पोलिसांना 2084 तक्रारी पाठविण्यात आल्या. पोलिसांनी मुंबई परिसरात फसवणूक झालेल्या 27 तक्रारी तपासण्यास घेतल्या. यातील एकाची फिर्याद दाखल करुन घेत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले.
मुलुंडमधील या तक्रारदाराला हॅप्पी लोन अॅपच्या माध्यमातून अवघ्या आठ हजार रुपयांचे कर्ज घेणे महागात पडले होते. त्याला बलात्कारी दाखवून धमकावले गेले होते. पोलिसांनी डोमेन तपासल्यानंतर त्यांना एक मोबाईल नंबर सापडला. पोलिसांनी या व्यक्तीला पाचारण केले. तो धुळ्यातील महादू गवळी हा 46 वर्षीय भाजी विक्रेता होता. त्याचे व्हॉट्सअॅप त्याच्या नकळत कोणीतरी वापरत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्या मोबाईलवर ओटीपी सापडला. याच ओटीपीच्या आधारे पोलिसांनी तपासचक्रे फिरवली.
अखेर पोलिसांनी धारवाडमधील अहमद रजा जाहीद हुसेन (26) याला गाठले. बारावी नापास असलेल्याअहमद याने 150 किलोमीटरवर अकोला येथे असणार्या व्यक्तीने मला नोकरी आणि हे काम दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. राज्य सायबर पोलिसांनी एमबीए आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेल्या सुहेल नसिरूददीन सय्यद (24) याला ताब्यात घेतले.
सुहेल हाच त्यांना दररोज लॉगईन आयडी आणि पासवर्ड देत होता. स्थानिक पोलिसांची मदत घेत ऑटोमोबाईल शॉपधारक सय्यद मो. अतहर (24), कंप्युटर सायन्सचे शिक्षण घेत असलेल्या मोहम्मद कैफ कादरी (22) आणि आयटीआय शिक्षित मुफ्तीयाज मो. बाशा पिरजादे (21) यांना ताब्यात घेत अटक केली.
हेही वाचा