चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन पट्टेदार वाघांच्या झालेल्या झुंजीमध्ये एक नर पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागभीड तालुक्यातील किटाळी (बोरमाळा) गावाजवळील एका नाल्याजवळ उघडकीस आली आहे. काल सोमवारी (दि. २८) रोजी सकाळच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दिलेल्या अभिप्रायानुसार, त्या वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र हुमा गट क्रमांक ५८२ किटाळी बोरमाळा गावाजवळील जंगलात वनरक्षक आणि पीआर टीम गस्त घालत असताना किटाळी बोरमाळा गावालगत असलेल्या बोकाडडोह नाल्याजवळ एक पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. वनरक्षक यांनी लगेच क्षेत्र सहाय्यक व वन परिक्षेत्र अधिकारी नागभीड यांना दूरध्वनीद्वारे याबाबतची माहिती दिली.
यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतावस्थेतील वाघाचा पंचनामा करण्यात आला. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळून आला, त्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता घटनास्थळापासून ३० मीटर अंतरावर दोन वाघात झालेल्या झुंजीच्या पाऊलखुणा, निशाने व रक्त आढळून आले.
सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जावून घटनेची पाहणी केली. मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी ब्रह्मपुरी व नागभिड यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात वाघाच्या पुढील पायावर व गळ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे दोन वाघांच्या झुंजीत एका नर पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
शवविच्छेदनानंतर मृत वाघाचे गट क्रमांक ६४३ मध्ये सर्वांसमक्ष दहन करण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरी व नागभीड येथील वन विभागाचे अधिकारी, इकोप्रोचे प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक (ntca) चे प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक (pccf) चे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?