Latest

राधानगरी : लग्नाळूंनो सावधान! लग्न लावून देऊन आर्थिक फसवणूक करणारी टोळी

स्वालिया न. शिकलगार

राशिवडे : पुढारी वृतसेवा

विवाह लावून देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळक्यास राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाह लावून देऊन आर्थिक फसवणूक केल्याबद्दल विक्रम केशव जोगम (वय २४, रा. म्हासुर्लीपैकी जोगमवाडी, ता. राधानगरी) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या टोळीकडून बरेच फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विक्रम जोगम याचा विवाह दि. २२/६/२१ रोजी रात्री ९ वाजता म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय ३८, रा. चांदणी चौक तारदाळ ता. हातकणंगले) यांच्याशी करण्यात आला.

यावेळी विवाह ठरविण्यासाठी खुद्द तिचा पती संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबु शेख, समिना फिरोज शेख (रा. शाहुनगर चंदुर सध्या रा. ठाकरे चौक जवाहरनगर इचलकरंजी) हे होते. त्यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले. हा विवाह करताना आधीच्या झालेल्या तीन विवाहाची माहिती लपवून ठेवली. घेतलेली रक्कम आपसात वाटून घेतली.

त्यानुसार संबधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथून पो. नि. आण्णासो कोळी, उपनिरीक्षक नजीर खान पो. हे. काँ. सुरेश मेटील, प्रमोद पाटील, सौ. भाग्यश्री राख यांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. या टोळक्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कुणाची फसवणूक झाली असेल तर राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन आप्पासो कोळी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT