नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार - पुढारी

नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज १४ डिसेंबर रोजी होत आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.

या निवडणुकीत १० डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी ९८.९३ टक्के इतकी होती. यात २८३ महिला आणि २७१ पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण ५६० पैकी ५५४ मतदारांनी मताधिकार बजावला आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रविंद्र भोयर व अपक्ष मंगेश देशमुख हे उमेदवार असून दुपारपर्यंत विजयी उमेदवार कोण हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळून कोटा पूर्ण होईल तो उमेदवार विजयी घोषित करण्यात येईल.

परंतु पहिल्या पसंतीची मते मिळून एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही. तर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या आधारे मतमोजणी होईल. यात कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होईल. मतमोजणीच्या वेळी अगोदर अवैध मते शोधण्यात येतील. प्रथम पसंतीक्रम न दर्शविणे, पसंतीक्रम शब्दात नोंदविणे, चुकीच्या पध्दतीने क्रमांक लिहिणे, वेगळा पेन वापरणे इत्यादी कारणांमुळे मत अवैध ठरु शकते.

मतमोजणीच्या सुरुवातीला २५-२५ चे गठ्ठे तयार करुन अवैध मते बाजूला करण्यात येणार आहे. ४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन पारिसरात प्रवेशपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच मुख्य प्रवेशव्दारातून परवानगी मिळणार आहे. अन्य अभ्यागत व कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील प्रवेशव्दारातून परवानगी दिली जाणार आहे. २०० मिटर क्षेत्र प्रतिबंधीत असून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : का चिडले शाहू महाराज जेवणाच्या पंगतीत ? | The story of Ch. Shahu Maharaj

Back to top button