Latest

Krishna basin : कृष्णा खोर्‍यातील 38 धरणांमध्ये 84.73 टक्के पाणीसाठा

अमृता चौगुले

पुणे : कृष्णा खोर्‍यातील (भीमा उपखोर्‍यासह) मध्यम व मोठ्या असलेल्या 38 प्रकल्पांमध्ये आतापर्यंत 187.34 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 84.73 टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसामुळे उजनी धरणातही 41 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कृष्णा खोर्‍यातील भीमा उपखोर्‍यामध्ये पुणे जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडल्यामुळे धरणे भरली नाहीत. परिणामी, धरणातील पाणी नद्यांमधून उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात गेले नाही.

मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील पावसामुळे काही धरणे पूर्ण भरून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. ते पाणी उजनीच्या जलाशयात जमा होत आहे. त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी होणार आहे. याचबरोबर भीमा उपखोर्‍यातील 26 धरणांमध्ये एकूण 158.52 टीएमसी (79.92 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कृष्णा खोर्‍यात मागील एक ते दीड महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला होता. मात्र, मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने सरासरीच्या आसपास हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठ्यात बर्‍यापैकी वाढ झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT