Latest

China Corona Update : चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख लोकांना कोरोनाची लागण

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये कोविडच्या (China Corona Update) ओमायक्रॉन बीएफ -७ या विषाणूंने हाहाकार माजवला आहे. या आठवड्यात एका दिवसात चीनमध्ये सुमारे ३ कोटी ७० लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. बुधवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या झालेल्या बैठकीत डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत किमान २४८ दशलक्ष लोकांना म्हणजेच सुमारे १८ टक्के लोकसंख्येला या विषाणूची लागण झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चीनने शून्य कोविड धोरण रद्द केल्यामुळे लोकसंख्येमध्ये संसर्गजन्य कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराचा (China Corona Update)  बिनदिक्कत प्रसार झाला आहे. चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांत आणि राजधानी बीजिंगमधील निम्म्याहून अधिक नागरिकांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये आता संसर्ग शोधण्यासाठी रॅपिड अॅंटीजन टेस्टचा वापर केला जात आहे.

दरम्यान, सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन संख्या जाहीर करण्यास बंदी घातली आहे. डेटा कन्सल्टन्सी मेट्रोडेटाटेकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ चेन किन यांनी सांगितले की, चीनमधील बहुतेक शहरे डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या अखेरीस संसर्गाच्या शिखरावर असतील. आतापर्यंत शेन्झेन, शांघाय आणि चोंगकिंग शहरांमध्ये लाखो लोकांना संसर्ग झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

China Corona Update : चीन संपूर्ण लॉकडाऊन होऊ शकतो

चीनच्या बीजिंग, सिचुआन, अनहुई, हुबेई, शांघाय आणि हुनानमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (दि.२४) किंवा रविवारी (दि.२५) कोविड आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग चीनमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करू शकतात. बीजिंगमध्ये संसर्गाचे प्रमाण ५० ते ७० टक्के असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शांघायमध्ये पुढील आठवड्यापर्यंत २५ दशलक्ष लोकांना कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

जिनपिंग सरकारवर डेटा लपविल्याचा आरोप

जिनपिंग सरकारवर कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे केवळ ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ २० डिसेंबर रोजी चीनमध्ये ३६ दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत चीनमध्ये ११ लाख लोकांनी मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. बीजिंग आणि शांघायमध्ये ६० तर चेंगडूमध्ये ४० नवीन स्मशानभूमी बांधली जात आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT