Latest

नागपूर : पार्किंगच्या वादात १९ वर्षीय तरुणाचा खून

स्वालिया न. शिकलगार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – घरासमोर वाहन पार्क करण्यावरून दोन गटात वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना यशोधरानगर परिसरात घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने (वय १९) असे असून तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण गंभीर जखमी आहेत.

दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांचा मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात वाहन पार्क करण्यावरून वाद झाला होता. वादात एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश हा रामभाऊ शाहू यांच्या घरी आला. ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. आवाज ऐकून नंदलाल आणि सुदामा आले व त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत योगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोनू बन्सीलाल रायतदार सुदामा बन्सीलाल रायतदार आणि नंदलाल रायतदार या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

SCROLL FOR NEXT