नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील काही राज्यांमधून 'वंदे भारत'ट्रेन सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये इतर राज्यांमधूनदेखील ही ट्रेन सुरू होईल. २०२५ अखेर पर्यंत देशात २७८ वंदे भारत ट्रेन संचालित केले जातील, अशी माहिती समोर आली आहे. तर,२०२७ पर्यंत ४७८ वंदे भारत ट्रेन धावतील. सध्या रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफ तसेच खासगी कंपनी 'मेधा' यांच्याकडून ७८ वंदे भारत ट्रेन तयार केल्या जात आहे. याशिवाय खासगी कंपनीच्या माध्यमातून ४०० वंदे भारत ट्रेन आणखी तयार केल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे.
जानेवारी अखेरपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडून २०० नवीन वंदे भारत ट्रेन साठी कंत्राट काढले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कंत्राट प्रक्रियेत सर्वाधिक कमी बोली लावणाऱ्या कंपनीला १२० ट्रेन बनवण्याचे कंत्राट दिले जाईल. तर, कंत्राट प्रक्रियेत क्रमांक दोन वर राहणाऱ्या कंपनीला ८० वंदे भारत ट्रेन बनवण्याचे कंत्राट दिले जाईल.केंद्र सरकारने सध्या देशात ४७८ वंदे भारत ट्रेन चालवण्यास मंजूरी दिली आहे. सुरूवातीच्या टप्यातील ७८ ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. या सर्व ट्रेन 'चेअर कार मॉडेल'वर सुरू केल्या जातील.