Latest

BJP MPs | नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, राठोड यांच्यासह भाजपच्या १० खासदारांचे राजीनामे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी बुधवारी आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यात मध्य प्रदेशातील नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप आणि रिती पाठक, छत्तीसगडमधील अरुण साओ आणि गोमती साई तर राजस्थानमधील राज्यवर्धन सिंह राठोड आणि किरोडी लाल मीना यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

तोमर आणि पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचाही राजीनामा दिला आहे. किरोडी लाल मीणा हे एकमेव राज्यसभेचे खासदार आहेत. ते आता पदावरुन पायउतार झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सादर केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकलेले केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद सिंह पटेल यांनी , "मी लवकरच कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देईन." असे म्हटले होते.

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखली आहे.

दरम्यान, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यपालांना राजीनामे सुपूर्द केले आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल होती.

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह आणि महंत बालकनाथ हे देखील लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

SCROLL FOR NEXT