पुढारी ऑनलाईन डेस्क : द्रविड मुन्नेत्र कळघम (डीमके) चे खासदार डी. एन. व्ही. सेंथिलकुमार एस यांनी त्यांच्या 'गोमूत्र राज्य' विधानावर माफी मागितली आहे. लोकसभेत त्यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. (Senthil Kumar) डी. एन. व्ही. सेंथिलकुमार यांनी मंगळवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की भाजप केवळ हिंदी पट्ट्यातील "गो मुत्र" राज्यांमध्येच निवडणुका जिंकतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
सेंथिलकुमार यांनी आपण केलेल्या वक्तव्याबदद्ल माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की," पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना मी एक शब्द वापरला आहे. तो वापरण्यामागे माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नव्हती. याबद्दल मला खेद वाटतो."
लोकसभेत 'जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक' आणि 'जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक' यावरील चर्चेत भाग घेताना द्रमुकचे डी. एन.व्ही. सेंथिलकुमार म्हणाले, "या देशातील जनतेने विचार केला पाहिजे की भाजपची निवडणुका जिंकण्याची क्षमता फक्त हिंदी पट्ट्यातील राज्यांनाच आहे. ज्यांना आपण 'गोमूत्र राज्य' म्हणतो." नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली आहे, तर तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. .
सेंथिलकुमार यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जावू लागला. "काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारला जावू लागला, उत्तर भारतीयांविरोधातील त्यांच्या मित्रपक्षाच्या अपमानास्पद विधानांशी ते सहमत आहेत का? तामिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी सेंथिलकुमार यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते "असंवेदनशील' असल्याचे म्हटले आहे. द्रमुकची विचारसरणी चेन्नईप्रमाणेच बुडत असून द्रमुकचा उद्दामपणा हे त्याचे प्रमुख कारण असेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा