पुढारी ऑनलाइन डेस्क : Largest Hindu Temple in Germany : जर्मनीत राहणाऱ्या भारतीय हिंदूंनी 20 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर श्री गणेशाचे जर्मनीतील सर्वात मोठे हिंदू मंदिर बर्लिन येथे साकारले आहे. लवकरच कुंभाभिषेक अभिषेक सोहळा होणार आहे. बर्लिनमधील भारतीय हिंदूंना हे मंदिर साकारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. हे मंदिर बांधण्यासाठी विविध परवानग्या, आर्थिक आव्हान, कलाकुसर, कारागिरांचा प्रश्न, शास्त्रीय पद्धतींनी मूर्तींची घडण हे सर्व पाहणे अत्यंत रंजक आहे. हे मंदिर बांधण्यासाठी अथक प्रयत्न परिश्रम घेणाऱ्या मंदिर संघटनेचे विलवनाथन कृष्णमूर्ती यांनी डीडब्ल्यूला दिलेल्या मुलाखतीनुसार हिंदुस्थान टाइम्सने याचे वृत्त दिले आहे.
आज बर्लिनमध्ये जे जर्मनीतील सर्वात मोठे हिंदू मंदिर साकारण्यात आले आहे. त्याचा पाया विलवनाथन कृष्णमूर्ती यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून घालण्यात आला. विलवनाथन कृष्णमूर्ती मूळ भारतीय आहेत जे 50 वर्षांपूर्वी बर्लिन येथे कामानिमित्त स्थायिक झाले. ते 70 वर्षांचे गृहस्थ असून त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांनी बर्लिनमध्ये भव्य मंदिर असावे असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी जर्मनीतील इतर हिंदू बांधवांना एकत्रित करून विचार मांडला. त्यानंतर 2004 मध्ये श्री-गणेश हिंदू मंदिर बांधण्यासाठीची संघटना अस्तित्वात आली.
मंदिर बांधणीसाठी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे नियम, मंजुरी प्रक्रिया, अंतिम मुदत आणि सर्वात महत्वाचे पैसा उभारणी हे पहिल्या टप्प्यातील आव्हाने होती.
जिल्हा प्राधिकरणाने असोसिएशनला क्रुझबर्ग, न्युकोलन आणि टेंपलहॉफ जिल्ह्यांमधील हसनहाइड पार्कच्या काठावरचा भूखंड देऊ केला. त्यानंतर जागेचा प्रश्न सुटला.
हे मंदिर फाउंडेशनने स्वतःच्या निधीतून बांधले आहे. कृष्णमूर्ती म्हणाले की, आम्ही हे आमच्या स्वतःच्या देणग्यांद्वारे पार पाडले. बर्लिन सिनेटकडून, जिल्हा प्राधिकरणाकडून किंवा फेडरल सरकारकडून कोणतेही समर्थन मिळाले नाही. मी हे देखील समजू शकतो. ते पुढे म्हणाले, "आम्हाला उधारीवर मंदिर बांधायचे नव्हते. आमच्या भावी पिढ्यांना ते परत करावे लागले असते. त्यामुळे आम्ही देणग्यांवर अवलंबून होतो, असे ते म्हणाले.
सुरुवातीला देणग्यांसाठी आम्हाला फार काळ वाट पाहावी लागली. मात्र, काळ पुढे सरकत गेला. तंत्रज्ञानाच्या भरभराटीमुळे बर्लिनमध्ये अनेक तरुण भारतीयांना आयटी कंपन्यांनी बर्लिनकडे खेचले. भारतीय दुतावासानुसार बर्लिनमध्ये भारतातील 15000 लोक राहतात. तथापि इतर अंदाजानुसार, उपखंडातील 20,000 लोक बर्लिनमध्ये राहतात. त्यामुळे अलिकडील 5 वर्षांच्या काळात अनेक तरुण भारतीय पुढे आले. आमच्याकडे देणग्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पैसा उभारणीस वेग आला.
देणग्यांचा ओघ वाढल्याने मंदिर बांधणीच्या कामाला यावर्षी मोठा वेग आला. युरोपमध्ये उन्हाळा असतानाही 50 विशेषज्ञ आणि कारागीर मंदिर बांधणीच्या जागेवर कार्यरत होते, असे कृष्णमूर्तींनी सांगतिले.
कृष्णमूर्ती यांनी भारतातील तज्ज्ञ कारागीरांनी कशा पद्धतीने हे मंदिर घडवले या विषयी देखील माहिती दिली. 5000 वर्ष जुन्या वैशिष्ट्यांनुसार कठोर दगडापासून हे शिल्प घटवण्यात आले. जवळपास एकूण 27 शिल्प आहेत. तर मंदिराच्या आतील भागातील काही कोनाड्यांचे रंगकाम बाकी आहे. तर त्याच्या समोर पांढऱ्या आणि दगडी आकृत्या रक्षक म्हणून उभ्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. या दीपोत्वसापूर्वी मंदिराचे उरलेले सर्व बांधकाम पूर्ण करायचे आहे. तसे झाल्यास सहा दिवसांचा कुंभाभिषेक अभिषेक सोहळा सुरू होऊ शकतो, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
हे ही वाचा :