सनातन धर्मावरील उदयनिधींच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध, २६० मान्‍यवरांचे सरन्‍यायाधीशांना पत्र | पुढारी

सनातन धर्मावरील उदयनिधींच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध, २६० मान्‍यवरांचे सरन्‍यायाधीशांना पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्मा’वरील वादग्रस्‍त वक्तव्याचा देशभरातून तीव्र निषेध व्‍यक्‍त होत आहे. आता देशभरातील २६० हून अधिक मान्‍यवर नागरिकांनी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्मा’वरील टिप्पणीची दखल घेण्याची विनंती केली आहे. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश के. श्रीधर राव, गुजरातचे माजी न्यायाधीश आणि लोकायुक्त एसएम सोनी यांच्यासह एकूण १४ न्यायाधीशांसह अनेक माजी निवृत्त अधिकारी, राजदूत आणि निवृत्त पोलिस अधिकार्‍यांची नावे आहेत.

सरन्‍यायाधीशांना दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, उद्‍यनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याने सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या भारतातील सर्वसामान्य नागरिकांचे मन व्‍यथित झाले आहे. या टिप्पण्या निर्विवादपणे भारताच्या मोठ्या लोकसंख्येच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण आहे. अशी विधाने भारताच्या राज्‍यघटनेच्‍या भावनेवरच हल्ला करते. भारतीय राज्‍यघटनेत भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून कल्पना केली जाते. देशाचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपण्यासाठी कृती करण्याची गरज असल्याचेही या पत्रात नमूद केले आहे.

सनातन धर्माच्‍या अवमानाची दखल घ्‍यावी

“आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की अवमानाची स्वतःहून दखल घ्यावी, तमिळनाडू सरकारला त्याच्या निष्क्रियतेसाठी जबाबदार धरावे. द्वेषयुक्त भाषण थांबविण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी निर्णायक पावले उचलावीत. आम्ही आशा करतो की आमच्‍या विनंतीचा विचार केला जाईल, असेही या पत्रात म्‍हटले आहे.

काय म्‍हणाले होते उदयनिधी स्‍टॅलिन?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी शनिवारी चेन्नई येथे तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या सभेला बोलताना ‘सनातन धर्म’ची तुलना कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यू तापाशी केली होती. अशा गोष्टींना केवळ विरोध करू नये, तर कायमस्‍वरुपी नष्ट केले पाहिजे, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

हेही वाचा :   

 

 

Back to top button