पुढारी ऑनलाईन डेस्क
अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेली अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहे. तिची नवी मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' येत आहे. सुंदर उर्मिला एक उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिचा अभिनयातला प्रवास ते कोठारे कुटुंबीयांची सून इथवरपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहितीये का? तिची आदिनाथ कोठारेसोबतची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. जाणून घेऊया उर्मिला कोठारे विषयी. (Urmila Kothare)
उर्मिला कानेटकर कोठारे एक मराठी चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आहे. दुनियादारीतील भूमिकेसाठी उर्मिलाला ओळखलं जातं. शुभ मंगल सावधान, ती सध्या काय करते तसेच हिंदी टीव्ही मालिका मायका आणि मेरा ससुराल त्याचसोबत मराठी मालिका असंभव, गोष्ट एका लग्नाचीमध्ये तिने अभिनय केला आहे. ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने २०१४ मध्ये वेलकम ओबामामधून तिने तेलुगु सिनेमातही काम केले आहे. यामध्ये तिने यशोदा नावाची भूमिका साकारली होती.
उर्मिलाचा जन्म ४ मे, १९८६ रोजी पुण्यात झाला होता. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतलीय. तिने ओडिसीसाठी भुवनेश्वर येथे सुजाता महापात्रा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
शुभ मंगल सावधान तिचा पहिला चित्रपट होता. आई शपथ आणि सावली या चित्रपटांमध्येही ती झळकली. यामध्ये तिने दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्यासोबत काम केले होते.
आपल्या पहिल्या चित्रपटादरम्यान, ती आदिनाथ कोठारेशी भेटली. या चित्रपटाचा आदिनाथ सहायक दिग्दर्शक होता.
उर्मिलाला पहिल्यांदा पाहताच क्षणी आदिनाथ कोठारे तिच्या प्रेमात पडला होता. तो तिचा सर्वात मोठा चाहता आहे. नंतर तो आयुष्यभराचा साथीदार झाला. उर्मिलाची लव्हस्टोरीदेखील एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. उर्मिलाचा अभिनेत्री म्हणून एकही चित्रपट आला नव्हता. त्याचवेळी महेश कोठारे म्हणजे आदिनाथचे वडील 'शुभमंगल सावधान' हा चित्रपट करत होते. त्यांना या चित्रपटासाठी नवी अभिनेत्री हवी होती. या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी उर्मिला महेश यांच्या घरी गेली होती. तेव्हा तिथं आदिनाथ देखील होता. त्याने उर्मिलाकडे पाहिल्यानंतर तो तिच्या प्रेमातच पडला.
पुढे अनेक वर्षे डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते.
तुझेच मी गीत गात आहे ही तिची नवी मालिका येतेय. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, 'खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.'